अहिल्यानगर । झुंझार न्यूज
संध्या राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, अहिल्यानगरमध्येही निवडणुकीचे जोरात वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शहराचा विकास, स्थानिक प्रश्न आणि लोकशाहीत माध्यमांचे महत्त्व असल्याचे सांगितले .

अहिल्यानगर शहराच्या विकास प्रक्रियेत असलेले अडथळे आणि प्रलंबित प्रश्न यावर नामदार विखे पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. राज्यातील महापालिका निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “अहिल्यानगर शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे. शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीप्रश्न आणि स्थानिक प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.” स्थानिक पातळीवर काम करताना येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवरही यावेळी मोकळेपणाने चर्चा करण्यात आली.
या संवाद बैठकीत विखे पाटील यांनी माध्यमांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “माध्यमे हा लोकशाहीचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. जनतेपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचवणे आणि सरकारचा विकास आराखडा लोकांपर्यंत नेणे, यामध्ये पत्रकारांची भूमिका मोलाची असते. समाजातील प्रश्नांना वाचा फोडतानाच सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीला हातभार लावावा. असे आवाहन केले .
प्रशासकीय पारदर्शकता आणि कामाची गती वाढवण्याबाबतही यावेळी विचारमंथन झाले. समाजातील विविध थरातील प्रश्न मांडताना प्रशासनाने अधिक संवेदनशील राहणे गरजेचे आहे, अशी भावना विखे पाटील यांनी व्यक्त केली.
या स्नेहसंवाद कार्यक्रमास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, विनायक देशमुख यांच्यासह भाजप आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या धामधुमीत विखे पाटील आणि संग्राम जगताप यांची एकत्र उपस्थिती ही शहराच्या राजकारणाला नवी दिशा दिसली जाणार आहे.

या बैठकीमुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण अधिक सक्रिय झाले असून, येणाऱ्या काळात विकासाच्या मुद्द्यावरून निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Post Views: 609



