शिर्डी । झुंझार न्यूज
नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत अशा त्रिवेणी संगमामुळे शिर्डीत साईभक्तांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता. २५ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या नऊ दिवसांच्या ‘शिर्डी महोत्सवा’त देश-विदेशातील सुमारे ८ लाख ८० हजारांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी आपल्या लाडक्या बाबांच्या झोळीत तब्बल २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये इतकी विक्रमी देणगी अर्पण केली आहे, अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
महोत्सवाच्या काळात भाविकांनी विविध माध्यमांतून सढळ हाताने दान दिले. यामध्ये रोख रकमेसह डिजिटल पेमेंटचा मोठा वाटा आहे

-
दानपेटी (दक्षिणा): ६ कोटी २ लाख ६१ हजार ६ रुपये.
-
देणगी काउंटर: ३ कोटी २२ लाख ४३ हजार ३८८ रुपये.
-
पीआरओ सशुल्क पास: २ कोटी ४२ लाख ६० हजार रुपये.
-
ऑनलाइन व डिजिटल देणगी: बदलत्या काळानुसार भाविकांनी ऑनलाइन बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, चेक आणि मनीऑर्डरला पसंती दिली असून, याद्वारे १० कोटी १८ लाख ८६ हजार ९५५ रुपये जमा झाले आहेत.
-
परकीय चलन: जगातील २६ देशांतील परकीय चलनातून १६ लाख ८३ हजार ६७३ रुपये प्राप्त झाले.
या नऊ दिवसांत केवळ रोख रक्कमच नाही, तर सोन्या-चांदीच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात आल्या. यात २९३ ग्रॅम सोने (३६.३८ लाख रुपये) आणि ६ किलो चांदी (९.४९ लाख रुपये) यांचा समावेश आहे. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका साईभक्ताने अर्पण केलेला ८० लाख रुपये किमतीचा मुकुट. हा मुकुट ५८६ ग्रॅम शुद्ध सोने आणि १५३ कॅरेटच्या मौल्यवान हिऱ्यांनी जडलेला आहे.

गर्दीचे नियोजन करताना संस्थानने भाविकांच्या खानपानाचीही चोख व्यवस्था केली होती
-
मोफत भोजन: साई प्रसादालयात ६ लाख भाविकांनी भोजन घेतले.
-
अन्न पाकिटे: १ लाख ९ हजार भाविकांना पाकिटांचे वाटप करण्यात आले.
-
लाडू प्रसाद: ७ लाख ६७ हजार लाडू पाकिटांच्या विक्रीतून संस्थानला २.३० कोटी रुपये मिळाले.
-
बुंदी प्रसाद: ५ लाख ७६ हजार भाविकांना मोफत बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
संस्थानला प्राप्त होणाऱ्या या अफाट देणगीचा वापर सामाजिक कार्यासाठी केला जातो, असे गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले. साईबाबा रुग्णालय आणि साईनाथ रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय उपचार, गरजू रुग्णांना मोफत सेवा, शैक्षणिक संस्थांचे संचालन आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी हा निधी खर्च केला जातो.

महोत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी संस्थानचे सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले, ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता आले .



