धारावी (मुंबई) झुंझार न्यूज
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धारावीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १८६ मधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या अधिकृत उमेदवार कुमारी स्नेहा सिद्धार्थ कासारे यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आठवले यांनी आपल्या खास शैलीत ‘रिपाई’चे महत्त्व अधोरेखित केले.

‘निप’शिवाय पेन लिहू शकत नाही; आठवलेंची फटकेबाजी
कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे जरी पेन असले, तर रिपब्लिकन पक्ष हा त्या पेनाची ‘निप’ आहे. ज्याप्रमाणे निपशिवाय पेन काहीही लिहू शकत नाही, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाच्या साथीशिवाय सत्तेचे समीकरण पूर्ण होऊ शकत नाही.” या विधानातून त्यांनी महायुतीमधील रिपब्लिकन पक्षाचे स्थान आणि ताकद अधोरेखित केली. स्नेहा कासारे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि तळागाळातील प्रश्नांची जाण असलेला चेहरा आम्ही दिला असून, धारावीच्या विकासासाठी जनता त्यांना नक्कीच कौल देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्याला रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ भाई कासारे, वॉर्ड अध्यक्ष अश्विन वाघ, धारावी झोपडपट्टी प्रमुख संजय भालेराव, मुंबई उपाध्यक्ष कुमेल शेख, जिल्हा अध्यक्ष तथा कामगार नेते प्रकाश कमळाकर जाधव यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धारावीत ‘रिपाई’चे शक्तिप्रदर्शन
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त धारावी परिसरात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. निळ्या रंगाचे झेंडे आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. कुमारी स्नेहा कासारे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवचैतन्य पसरले असून, या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे चित्र दिसत आहे.

