संगमनेर । झुंझार न्यूज

 

 


प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या प्रश्नावरून संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी आज पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. मात्र, राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून, महानगरपालिका निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.


नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे काम तातडीने मार्गी लागावे, या मागणीसाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने बोटा येथे महामार्ग रोखून धरण्यात आला होता. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रांताधिकारी अरुण उंडे आणि पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांच्या भावना आणि मागण्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवल्या.

पालकमंत्र्यांची मध्यस्थी आणि आश्वासन


यावेळी पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या ना. विखे पाटील यांनी तातडीने दूरध्वनीवरून आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार डॉ. किरण लहामटे, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले आणि सौ. निलम खताळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विखे पाटील यांनी सांगितले की, “सध्या महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून ती संपल्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच, दोन दिवसांपूर्वीच माझी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असून, त्यांनीही भेटीसाठी वेळ देण्याचे मान्य केले आहे.

आंदोलनकर्त्यांचा सकारात्मक प्रतिसाद


पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आणि प्रशासनाने केलेल्या विनंतीचा मान राखून, डॉ. किरण लहामटे आणि डॉ. अजित नवले यांनी उपस्थितांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. “आम्ही जनतेच्या भावना पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. शासनाने यावर ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, तरुण आणि दोन्ही तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे तणाव निवळला असून, आता रेल्वे मार्गाबाबत शासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *