आश्वी । झुंझार न्यूज
ग्रामीण भागातील संस्कृती जोपासत, भावी पिढीवर नैतिक मूल्यांचे संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सह्याद्री शिक्षण संस्था सातत्याने करत आहे. याच परंपरेचा भाग म्हणून, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांतून आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुधीरजी तांबे यांच्या दूरदृष्टीतून सुरू असलेल्या सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल (शिबलापूर) येथे ‘आजी-आजोबा ऋणानुबंध’ सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

मुले, आई-वडील आणि आजी-आजोबा या तीन पिढ्यांना जोडणारा दुवा म्हणजे संस्कार. सह्याद्री शाळेने या सोहळ्याच्या माध्यमातून हाच कौटुंबिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या धावपळीच्या युगात आजी-आजोबांचे घरातील स्थान आणि त्यांचे महत्त्व मुलांना समजावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे पाद्यपूजन करून त्यांना वंदन केले. आपल्या नातवंडांनी दिलेला हा सन्मान पाहून अनेक आजी-आजोबांचे डोळे पानावले होते. मुलांनी आपल्या भाषणांतून आजी-आजोबांच्या आवडीनिवडी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि लावलेली शिस्त याबद्दलचे अनुभव व्यासपीठावर मांडले.




