युवकांनी वाचन संस्कृती जोपासत योगाभ्यास व सकारात्मक विचारांची कास धरावी – प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे

सात्रळ । झुंझार न्यूज

 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला’ नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. मुकुंद रामराव जयकर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच जीवनकौशल्ये, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांचे मार्गदर्शन करण्यात आले.

या तीन दिवसीय कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांनी आपली विचारपुष्पे गुंफली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल माहिती दिली.

सकारात्मक विचारसरणीतून यशाकडे वाटचाल

व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. सूर्यकांत गडकरी यांनी ‘सकारात्मक विचारसरणी आणि प्रभावी विचार’ या विषयावर गुंफले. “आयुष्यात आव्हानांना सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मशिस्त अत्यंत महत्त्वाची आहे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली.

युवक वाचतील, तर देश वाचेल’

दुसऱ्या दिवशी प्रा. डॉ. नवनाथ अंगद शिंदे यांनी ‘युवक वाचतील, तर देश वाचेल’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून ती व्यक्तिमत्व घडवणारी निरंतर प्रक्रिया आहे. सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी युवकांचे मन सशक्त असणे आवश्यक आहे आणि ते केवळ वाचनातूनच शक्य आहे.” विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून आपली चिकित्सक विचारशक्ती विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

योगासन आणि प्राणायाम: निरोगी जीवनाचा आधार


तिसऱ्या दिवसाचे व्याख्यान प्रा. दत्तात्रय निवृत्ती कांबळे यांनी ‘योगासन व प्राणायाम- निरोगी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर दिले. केवळ शब्दांनी नव्हे तर प्रात्याक्षिकांद्वारे त्यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. “आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण शैक्षणिक वातावरणात मानसिक संतुलन आणि शारीरिक सुदृढतेसाठी योग व प्राणायाम अत्यंत आवश्यक आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे म्हणाले की, “सकारात्मक विचारसरणी ही यशस्वी जीवनाची पायाभरणी आहे. युवकांनी वाचनाला आयुष्यभराची सवय बनवावी आणि शरीरासोबत मन सुदृढ ठेवण्यासाठी योगाचा अवलंब करावा. माहितीपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक विद्यार्थीच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. जे. आर. सिनगार, डॉ. आर. एस. तांबे, प्रा. डी. एन. घाणे, डॉ. गंगाराम वडीतके, डॉ. सुष्मिता उंडे, डॉ. व्ही. जी. शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बहि:शाल केंद्रकार्यवाह प्रा. नंदकुमार भंडारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. भाऊसाहेब नवले यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि नैतिक विकासासाठी ही व्याख्यानमाला अत्यंत प्रेरणादायी ठरली, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

 


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *