पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर प्रशासनाचे पाऊल; राहुरी परिसरातील प्रवाशांना मिळणार दिलासा
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या भीषण वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार, या मार्गावरील वाहतूक नियमनासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, राज्याच्या होमगार्ड विभागाकडे २० जादा होमगार्डची मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीचा सर्वसामान्यांना फटका
अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. विशेषतः राहुरी शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी रस्ता खोदाई व दुरुस्तीमुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. रस्ता अरुंद झाल्याने आणि अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने या मार्गावर तासनतास वाहनांच्या रांगा लागत आहेत. या कोंडीचा मोठा फटका स्थानिक नागरिक, प्रवासी, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. वेळेवर शाळा-कॉलेजला पोहोचणे कठीण झाले असून, रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पालकमंत्र्यांचे तातडीचे निर्देश
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. केवळ पोलीस बलावर विसंबून न राहता, अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून होमगार्डची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
२० होमगार्डची मागणी
जिल्हा पोलीस प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करत, राज्याच्या होमगार्ड महासमादेशकांकडे ३० दिवसांच्या कालावधीसाठी २० जादा होमगार्ड उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. हे होमगार्ड विशेषतः राहुरी आणि सर्वाधिक कोंडी होणाऱ्या स्पॉटवर तैनात केले जातील, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.
डॉ. सुजय विखे पाटील प्रत्यक्ष मैदानात
दोन दिवसांपूर्वीच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील कोंडीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले होते. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी कामाचा वेग वाढवण्याच्या आणि पर्यायी मार्गांची नीट व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
होमगार्डची नियुक्ती झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागेल आणि सर्वसामान्यांचा प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांतच हे जादा मनुष्यबळ रस्त्यावर तैनात दिसणार आहे.