लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या उंबरी बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केळवड येथील ‘श्री नरेश राऊत फाउंडेशन’ च्या वतीने विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सॅनेटरी नॅपकिन पॅड मशीनचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शालेय वयात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या काळात त्यांची गैरसोय होऊ नये आणि आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, या उदात्त हेतूने श्री नरेश राऊत फाउंडेशनने हे मशिन विद्यालयाला भेट दिले आहे.
यावेळी श्री नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव लक्ष्मण पाटील गोरडे, फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी नवनाथ रजपूत , लेखापाल अंकुश बत्तासे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील भुसाळ, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब पाटील भुसाळ, युवा कार्यकर्ते डॉ. प्रशांत उंबरकर , सामाजिक कार्यकर्ते गणेश भुसाळ शिक्षक होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रसाळ होते.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात आरोग्याच्या समस्या अडथळा ठरू नयेत, यासाठी अशा आधुनिक सुविधांची अत्यंत गरज असून सॅनेटरी नॅपकिन मशीनमुळे विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढण्यास आणि शाळेतील उपस्थिती नियमित राहण्यास मदत होईल. असे मत व्यक्त होत असून श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले .