रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पानोडी । झुंझार न्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एकलव्य आ.भ.वि.जा.ज. व मा.से. संस्था संचलित अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (मांचीहिल, आश्वी बु।।) यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन संगमनेर तालुक्यातील हजारवाडी येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे औचित्य साधून अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘मोफत सर्वरोग निदान व तपासणी शिबिराला’ ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

 

या आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार व मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. अविनाश जाधव, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. अंबादास काळुखे आणि डॉ. मते यांनी रुग्णांना आरोग्यविषयक मोलाचे सल्ले दिले.

 

 

तसेच या शिबिरात डॉ. जयेश परदेशी, डॉ. विवेक देशमुख, डॉ. कुणाल पाटील, डॉ. दुर्गा गोटे, डॉ. क्षितिज देशमुख, डॉ. निलम, डॉ. शुभम बडोले, डॉ. तुषार मसूरकर, डॉ. रविराज डांगे, डॉ. मोहिनी पाटील, डॉ. नेहा पाटील, डॉ. सुकन्या ठाणगे यांच्यासह ऋतुजा जपे, ज्ञानेश्वरी जाधव, प्रतिक अहिरे आणि सौरभ कौठेकर या वैद्यकीय पथकाने रुग्णसेवेसाठी परिश्रम घेतले.

या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक ती औषधेही रुग्णांना विनामूल्य देण्यात आली. शिबिरामध्ये महिला, वयोवृद्ध नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. विशेषतः मूळव्याध, भगंदर, नेत्र चिकित्सा यांसह विविध व्याधींवर तज्ज्ञांनी उपचार केले. ज्या रुग्णांना पुढील व सखोल उपचारांची गरज आहे, त्यांना अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये येण्याचे आवाहन करण्यात आले.

 

संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर, अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णा बलमे आणि संचालक दत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबीर यशस्वीरित्या पार पडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन मोरे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र हिंगे आणि प्रा. सौ. स्नेहल आव्हाड , प्रा.किसन हजारे यांच्या नियोजनाखाली एन.एस.एस. स्वयंसेवकांनी हजारवाडीमध्ये घरोघरी जाऊन ग्रामस्थांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यामुळे संपूर्ण वाडीतून रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेतला.

याप्रसंगी बोलताना डॉ. शिवपाल खंडीझोड म्हणाले की, या शिबिराच्या माध्यमातून मूळव्याध, भगंदर, महिलांच्या समस्या, मोतीबिंदू आणि लहान मुलांचे आजार यावर प्रभावी उपचार व तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. आश्वी व परिसरातील प्रत्येक गावाने अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा शिबिरांचे आयोजन करावे आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करून आपले जीवन निरोगी बनवावे.

या उपक्रमाबद्दल हजारवाडी येथील ग्रामस्थांनी महाविद्यालय आणि आरोग्य पथकाचे विशेष आभार मानले आहेत.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed