आश्वी खुर्द येथे बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह;

 

पूंजाआईंच्या आयुर्वेदीय सेवाकार्याला भावपूर्ण उजाळा

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

आपल्या परिसराला लाभलेला आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदीय वारसा ही केवळ परंपरा नसून पुढील पिढ्यांसाठीची अमूल्य ठेव आहे. हा वारसा जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून केलेली समाजसेवा आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त मंदिर प्रांगणात आयोजित त्रिदिनी सप्ताह कार्यक्रमास सदिच्छा भेट देताना ते बोलत होते.

 

 

पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, ज्या काळात अंधश्रद्धा आणि जादूटोण्यांचा प्रभाव होता, त्या काळात पूंजाआई यांनी झाडपाल्यांपासून तयार केलेल्या औषधांच्या माध्यमातून रुग्णसेवा केली. कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी असंख्य आजारी भक्तांना दिलासा दिला. आयुर्वेद व अध्यात्म यांचा संगम साधत त्यांनी समाजाला आरोग्य, श्रद्धा आणि विश्वास दिला.

पूंजाआई या अत्यंत साध्या, तपस्वी आणि निष्ठावान शिवभक्त होत्या. त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळत सेवा, साधना आणि औषधी ज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधला. डोंगरदऱ्यांत आढळणाऱ्या दुर्मीळ औषधी वनस्पतींचे सखोल ज्ञान त्यांना होते. त्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांचे जीवन सुखावले असून आजही ग्रामस्थ त्यांना अपार श्रद्धेने स्मरतात.

 

महिलांची श्रद्धा — कुटुंबाचा आधार

त्रिदिनी सप्ताहानिमित्त पारायणासाठी बसलेल्या महिलांचे कार्य विशेष कौतुकास्पद असल्याचे नमूद करताना विखे पाटील म्हणाले की, महिलांच्या श्रद्धा आणि संस्कारांमुळेच कुटुंबातील पुरुषवर्ग निर्धास्तपणे कष्टाची कामे करू शकतो. पूंजाआई यांच्या ठायी विलक्षण आध्यात्मिक शक्ती होती. त्यांच्या सान्निध्यात आल्यावर भक्तांना मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान लाभते.


या प्रसंगी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी पूंजाआईंचे दर्शन घेत कार्यक्रमास उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापुसाहेब गायकवाड, ॲड. अनिल भोसले, पत्रकार संजय गायकवाड, उपसरपंच बाबा भवर, मोह त गायकवाड , प्रा. कान्हू गिते, कैलास गायकवाड, संतोष भडकवाड, बाबासाहेब भोसले शरद सोनवणे, सोपान सोनवणे, संजय भोसले, मनोज कहार, दगडू गायकवाड, कृष्णा कहार, लक्ष्मण भोसले, अमोल गायकवाड, संजय देशमुख, ह.भ.प. सुनील पवार, अमिरत यरमल, मनोज मेहरे, दीपक सोनवणे, सुजित क्षिरसागर, विकास गायकवाड, गौरव मुन्तोडे, आशिष गायकवाड, संजय साबळे, अतुल भोकरे, किरण बिडवे, उमेश सालकर, अदिनाथ जाधव, अमोल जाधव, स्वप्नील गायकवाड, जगदीश मुसमाडे, अविनाश सोनवणे, तुषार गायकवाड, भास्कर वाल्हेकर, रामा क्षिरसागर, दत्ता गायकवाड आदींनी विशेष योगदान दिले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *