‘एक जिव्हाळ्याचा मित्र गमावला’, राधाकृष्ण विखे पाटील यांची भावूक श्रद्धांजली
शिर्डी । झुंझार न्यूज
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.या घटनेवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, अजितदादांच्या जाण्याने राजकारणाच्या पलीकडचा एक जिव्हाळ्याचा मित्र गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले की, “बारामती येथे विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.”
विखे पाटील यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत पुढे म्हटले की, “गेली अनेक वर्षे विधानसभेत व मंत्रीमंडळात त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मला मिळाली. अजितदादांकडे अतिशय विकासात्मक दृष्टीकोन होता. कामकाजातील त्यांचा वक्तशीरपणा, प्रशासनातील शिस्त आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करण्याची त्यांची वृत्ती ही सदैव स्मरणात राहील. आज आपण एक असा मित्र गमावला आहे ज्याच्याशी वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध होते. हे दुःख शब्दांत मांडणे खरंच कठीण आहे.”
विखे पाटील यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना परमेश्वराकडे प्रार्थना केली की, “या दुर्दैवी घटनेतून सावरण्याची शक्ती परमेश्वराने पवार परिवारास आणि त्यांच्या सर्व आप्तेष्टांना द्यावी.”