महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (दादा) यांचे बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, संगमनेर येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या एका खाजगी विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहकाऱ्यांचेही निधन झाले. ‘दादा’ म्हणून सर्वसामान्यांमध्ये परिचित असलेल्या या नेत्याच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
संगमनेरमध्ये रिपब्लिकन पक्षाची शोकसभा या घटनेचे वृत्त समजताच संगमनेर तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित शोकसभेत अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
आशिष शेळके म्हणाले की, “अजित दादा हे केवळ एक नेते नव्हते, तर ते एक प्रखर व्यक्तिमत्व होते. कामाचा धडाका, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली पकड ही त्यांची ओळख होती. सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि कोणाचेही काम वेळेत पूर्ण करणारा असा हा लोकनेता सर्वांनाच हवा हवासा वाटणारा होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ‘कर्तृत्ववान दादा’ गमावला आहे.”
लोकनेत्याचा असा झाला अंत
बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला. ज्या मातीने त्यांना राजकीय ओळख दिली, त्याच मातीत त्यांच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट व्हावा, याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली