राजकारणातील शिस्त, वक्तशीरपणा आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जाणारे नाव म्हणजे अजित दादा पवार. मात्र, याच कडक शिस्तीच्या माणसामागे एक अत्यंत हळवे आणि कलावंतांविषयी आदर जपणारे मन दडलेले आहे, याचा प्रत्यय शिर्डीतील एका कार्यक्रमात आला होता. कोपरगावच्या बस स्थानकावर एकेकाळी भीक मागणाऱ्या लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांना अजित दादांनी ज्या नम्रतेने नमस्कार केला, तो प्रसंग आज पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या आठवणीतून उलगडला आहे.
एकेकाळी आपल्या अदाकारीने आणि लावणीने महाराष्ट्र गाजवणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. त्या कोपरगाव बस स्थानकावर भीक मागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनल्सवर व्हायरल झाला होता. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर, शासनाने तत्काळ त्यांना मदत जाहीर केली. १७ ऑगस्ट २०२३ रोजी शिर्डी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या भव्य कार्यक्रमात त्यांना ५ लाख रुपयांचा मदत निधी देऊन सन्मानित करण्याचे ठरले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. शांताबाईंना सन्मानासाठी स्टेजवर बोलवण्यात आले, मात्र काही तांत्रिक कारणास्तव त्यांना मंचावर पोहोचायला उशीर झाला. सभेत मोठी गर्दी होती आणि उशीर झाल्यामुळे वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले अजित दादा चिडतील की काय, अशी भीती उपस्थित कार्यकर्त्यांना वाटत होती.मात्र, शांताबाईंची स्टेजवर एन्ट्री झाली आणि चित्रच बदलले. लोकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी बावरलेल्या शांताबाई थेट अजित पवारांच्या समोर उभ्या ठाकल्या. त्यावेळी दादांनी कोणताही राग व्यक्त न करता, अत्यंत प्रेमाने शांताबाईंचा हात धरला आणि त्यांना आपल्याजवळ उभे केले. त्यांच्या चेहऱ्यावर एक आश्वासक स्मितहास्य होते, जणू काही त्यांची जुनीच ओळख असावी.
मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ५ लाख रुपयांचा धनादेश शांताबाईंना प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यानंतर घडलेल्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली. अजित दादांनी दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रपणे शांताबाई कोपरगावकर यांना नमस्कार केला. राज्याच्या एका बलाढ्य नेत्याने, एका पडत्या काळातील लोककलावंताला दिलेला हा मान पाहून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
हा सगळा प्रसंग जवळून पाहणारे चांदेकसारे येथील अरुण खरात यांनी ही आठवण शब्दात मांडली आहे. ते म्हणतात, “ज्या शांताबाईंना एकेकाळी लोकांनी वेडी समजून दगड मारले, त्याच शांताबाईंचा सन्मान महाराष्ट्राच्या ‘दादा’ने दोन्ही हात जोडून करावा, हे पाहून डोळ्यात आनंदाश्रू आले. अजित दादांच्या त्या कृतीने माझ्या मनात त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.”
शांताबाईंचा कोपरगाव बस स्थानकावरील संघर्षाचा प्रवास आणि शिर्डीच्या मंचावरील तो राजमान्य सन्मान, ही घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातील एक माणुसकीचा वस्तुपाठ ठरली आहे.