जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जल्लोष!
शिर्डी । झुंझार न्यूज
जलसंपदा विभाग हा राज्याच्या विकासाचा कणा मानला जातो. अहोरात्र शेती आणि उद्योगांसाठी पाणी नियोजनाचे काम करणाऱ्या या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत सांस्कृतिक स्पर्धेने शिर्डीत सर्वांची मने जिंकली.

नुकतीच लोणी येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची शानदार सुरुवात झाली होती. याच महोत्सवाचा एक भाग म्हणून दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
.

कलाविष्काराने जिंकली प्रेक्षकांची मने
प्रशासकीय सेवेत अत्यंत जबाबदारीने कार्यरत असतानाही या कलाकारांनी आपली कलेची ओढ कायम राखल्याचे या स्पर्धेतून दिसून आले. स्पर्धेमध्ये शास्त्रीय गायन, भावपूर्ण सुगम संगीत आणि महाराष्ट्राच्या मातीची सांस्कृतिक ओळख असलेले ‘गोंधळ’ नृत्य विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. यासोबतच हिंदी आणि मराठी गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यप्रस्तुतीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कलाकारांच्या प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. .

‘कामासोबत कला’ ही संकल्पना झाली साकार
दैनिक प्रशासकीय कामे, फाईल्सचा ढिगारा आणि क्षेत्रीय कामांचा ताण विसरून या कर्मचाऱ्यांनी ‘कामासोबत कला’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आपल्या सादरीकरणातून त्यांनी सांस्कृतिक जाणीव आणि मेहनतीचे दर्शन घडवले.
याप्रसंगी बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना कर्मचाऱ्यांच्या मनावर येणारा ताण अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे हलका होतो. अशा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्यात एकोपा वाढतो आणि संघभावना निर्माण होते. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट करण्याचे काम या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कलेच्या माध्यमातून केले आहे.”

या महोत्सवामुळे जलसंपदा विभागातील एकोपा वाढण्यास मदत होणार असून, कर्मचाऱ्यांच्या या कलाविष्काराची चर्चा संपूर्ण राज्यभरात होत आहे.
Post Views: 609

