विखेंची फलंदाजी अन् महाजनांची धारदार गोलंदाजी
आश्वी । झुंझार न्यूज
राजकारणाच्या पटलावर आपल्या चालींनी विरोधकांना निरुत्तर करणारे दोन दिग्गज नेते जेव्हा खेळाच्या मैदानात आमनेसामने येतात, तेव्हा तिथेही राजकीय चुरशीचा प्रत्यय येतो. लोणी येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या ५ व्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने हाच थरार पाहायला मिळाला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केवळ या स्पर्धेचे उद्घाटनच केले नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून क्रिकेट आणि बुद्धिबळाच्या पटावर एकमेकांना ‘पाणी पाजण्याचा’ प्रयत्न केला.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेचा शुभारंभ अत्यंत उत्साहात झाला. उद्घाटनानंतर दोन्ही मंत्र्यांनी क्रिकेटच्या खेळपट्टीवर हजेरी लावली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी हातात बॅट धरून फलंदाजीचा आनंद लुटला, तर भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांनी गोलंदाजीचे कसब दाखवले. महाजन यांच्या गोलंदाजीवर विखे पाटील यांनी मारलेले फटके पाहून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
क्रिकेटनंतर दोन्ही मंत्र्यांचा मोर्चा बुद्धिबळाच्या पटाकडे वळला. बुद्धिबळाच्या खेळातील त्यांच्या चालींकडे पाहून उपस्थितांमध्ये भविष्यातील राजकीय गणितांची चर्चा रंगली होती. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न केला. जरी हे खेळ मैत्रीपूर्ण असले, तरी त्यांच्यातील राजकीय प्रगल्भता आणि जिद्द या खेळांमधूनही स्पष्टपणे दिसून येत होती.
यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी आपल्या फिटनेसचे गुपित उघड केले. ते म्हणाले, “राज्यातील चांगल्या-वाईट प्रसंगांत मला ‘संकटमोचक’ म्हणून धाडावे लागते, कारण मी आजही नियमित व्यायाम करतो. काम करण्यासाठी केवळ बुद्धी नाही, तर मनगटातही दम लागतो.” सकाळी जिममध्ये गेल्यामुळे कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्याची कबुलीही त्यांनी मिश्किलपणे दिली.

तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, प्रशासकीय कामाच्या व्यापातून अधिकाऱ्यांचा ताण हलका व्हावा आणि त्यांच्यात सांघिक भावना निर्माण व्हावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. सहकारातून जसा विकास होतो, तसाच खेळांतून प्रशासनात शिस्त येते.

या सोहळ्याला जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पंकज शिरसाठ, अक्षय आव्हाड आणि श्वेता गवळी यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेच्या निमित्ताने जलसंपदा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, विखे-महाजन जोडीची ही ‘मैदानी जुगलबंदी’ सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली आहे.


