छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा आणि बुद्धीची देवता असलेल्या गणरायाची आराधना करणारा मराठी माणूस आज प्रगतीच्या शर्यतीत इतर समाजांच्या तुलनेत मागे पडत चालला आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक विचारवंत आणि युवकाच्या मनात घर करून आहे. उद्योग, व्यापार आणि जागतिक स्पर्धेत मराठी पाऊल मागे पडण्याची नेमकी कारणे काय? याबाबतचे एक सविस्तर विश्लेषण नुकतेच समोर आले असून, त्यातील २३ मुद्द्यांनी संपूर्ण समाजाला अंतर्मुख व्हायला लावले आहे.

राजकारण आणि ऐतिहासिक स्वप्नांचा विळखा

बातमीनुसार, मराठी माणूस आजही ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर जुन्या पराक्रमांच्या गप्पा मारण्यात तो तासनतास वाया घालवतो, पण सध्याच्या बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून उद्योग करण्यात कमी पडतो. त्यातच भर पडते ती ‘अति राजकारणाची’. स्वतःचा कामधंदा सोडून नेत्यांच्या सभेला लाखोंनी गर्दी करणारा मराठी माणूसच असतो. या उलट व्यापारी समाजातील लोक सभेपेक्षा आपल्या व्यवसायाला प्राधान्य देतात.


आर्थिक निरक्षरता आणि उद्योगाची भीती

मराठी कुटुंबात आजही ‘दोनच हात कमावणारे’ असतात, म्हणजे कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती कमवते. शेअर मार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज यांसारख्या आर्थिक बाबींपासून मराठी माणूस आजही लांब आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी गुजराती किंवा मारवाडी समाजात ज्या प्रकारे एकमेकांना विनाव्याज अर्थपुरवठा केला जातो, तशी पद्धत मराठी समाजात दिसत नाही. केंद्र सरकारच्या विना गॅरंटी ५ लाखांच्या कर्ज योजनेची माहिती घेण्यापेक्षा मराठी तरुण नोकरीच्या मागे धावण्यात धन्यता मानतो.

शिक्षण आहे, पण कौशल्य नाही!

आजचा पदवीधर मराठी तरुण ‘ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट’ला जास्त महत्त्व देतोय. पदवी असूनही प्रॅक्टिकल ज्ञान नसल्यामुळे सिव्हिल इंजिनिअर बेरोजगार आहेत, तर परप्रांतीय गवंडी-प्लंबर महिना ५० हजार कमवत आहेत. कष्टाची लाज वाटणे ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. एम.ए., बी.एड. झालेला तरुण साधी श्रमाची कामे करायला लाजतो, ज्यामुळे ‘ईझी मनी’च्या नादात तो भरकटत चालला आहे.

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी आणि उत्तम संवादकौशल्याची (Communication Skills) गरज असते. मात्र, मराठीचा अभिमान बाळगताना इंग्रजीचा तिरस्कार केल्याने मराठी माणूस कॉर्पोरेट जगात मागे पडतोय. ग्राहकाला देव मानण्याऐवजी त्याच्याशी उद्धटपणे वागणे किंवा वेळ न पाळणे यांमुळे मराठी व्यावसायिकांचा ‘रेफरन्स’ कमी होतो.

दुसऱ्याच्या यशावर जळणे आणि अपयशात आनंद मानणे ही वृत्ती मराठी माणसाच्या प्रगतीतील मोठा अडथळा ठरत आहे. ‘मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू’ असे चित्र अनेकदा दिसते. घरगुती वाद, संपत्तीवरून होणाऱ्या कोर्टकचेऱ्या आणि जातीपातींचे फालतू राजकारण यातच समाजाची ताकद क्षीण होत आहे. लग्नपत्रिकेत नाव नाही किंवा लग्नात आहेर दिला नाही, अशा क्षुल्लक कारणावरून होणारे वाद प्रगतीला खीळ घालत आहेत.

मराठी माणूस वर्षातील सरासरी १०० दिवस बारसे, वारी, यात्रा, राजकारण आणि सोशल मीडियात वाया घालवतो. पुढील २० वर्षांचे नियोजन करण्याची दूरदृष्टी नसल्याने ऐनवेळी आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास आर्थिक स्थिती कोलमडते. व्यसनाधीनता आणि आहाराकडे दुर्लक्ष यामुळे कमावलेला पैसा उपचारांत खर्च होतो.

जर मराठी माणसाला पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आपले वर्चस्व निर्माण करायचे असेल, तर ही २३ कारणे दूर करून ‘चाकोरी’ मोडणे आवश्यक आहे. नोकरीची मानसिकता सोडून उद्योजकतेकडे वळणे, एकमेकांना मदत करणे आणि वेळेचे नियोजन करणे हीच काळाची गरज आहे.

 

बातमी आवडल्यास शेअर करा!

संपर्क: सोमनाथ डोळे (झरेकाठी )

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *