राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचे पाठबळ मिळवण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

 

शिर्डी । झुंझार न्यूज

 

 


भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून अहील्यानगर जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्कार समारंभाचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करत नितीन नबीन यांनी लवकरच जिल्ह्याला भेट देण्याचे मान्य केले आहे.

 

पद्मश्री विखे पाटलांचे ‘पायोनियर’ चरित्र भेट


दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात ही भेट झाली. नितीन नबीन यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विखे पाटील यांनी त्यांची ही पहिलीच भेट घेतली. यावेळी त्यांनी नबीन यांचा सत्कार केला आणि सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे “पायोनियर” हे जीवनचरित्र त्यांना भेट म्हणून दिले.


राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत अहील्यानगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने केलेली कामगिरी आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीची सविस्तर माहिती ना. विखे पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. जिल्ह्याच्या या कामगिरीबद्दल अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

 

 

 

केंद्रीय नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा

 

 

या दौऱ्यात ना. विखे पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांचीही भेट घेतली. तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व अन्य केंद्रीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने विखे पाटील यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

 


राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी केंद्र सरकारचे आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ मिळावे, अशी विनंती विखे पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सिंचन क्षेत्रासाठी घेत असलेल्या धोरणात्मक निर्णयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.

 

या भेटीमुळे अहील्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आणि राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या संदर्भात मोठे सकारात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *