संगमनेर । झुंझार न्यूज
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गामध्ये रेल्वे विभागाने केलेल्या बदलामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे महसूल, जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या सविस्तर चर्चेनंतर, रेल्वे मार्गाच्या बदलाबाबत घेतलेल्या निर्णयाचा निश्चितपणे फेरविचार करू, अशी ग्वाही अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

मूळ आराखडा बदलल्याने जनक्षोभ
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ आराखडा तयार करताना हा मार्ग पुणे-नारायणगाव-संगमनेर-अकोले-सिन्नर असा निश्चित करण्यात आला होता. या मार्गामुळे संगमनेर आणि अकोले या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार होती. मात्र, अलीकडेच रेल्वे विभागाने या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची कोणतीही पूर्वकल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींना देण्यात आली नव्हती. मार्ग बदलल्यामुळे या भागातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून, ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू झाली आहेत.

विखे पाटील यांनी मांडली आग्रही भूमिका
संसद भवनात झालेल्या या भेटीत मंत्री विखे पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष या संवेदनशील विषयाकडे वेधले. “मार्गात बदल केल्यामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील जनतेवर अन्याय होत आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. हा प्रकल्प राबवताना जनतेच्या भावना आणि मागणीचा विचार होणे आवश्यक आहे,” अशी आग्रही भूमिका विखे पाटील यांनी मांडली. तसेच, रेल्वे मार्ग पहिल्या प्रकल्प आराखड्यानुसारच (संगमनेर-अकोले मार्गे) करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

रेल्वेमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
मंत्री विखे पाटील यांनी मांडलेली बाजू आणि स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेता, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. रेल्वे मार्गाच्या संदर्भात जो काही बदल सुचवण्यात आला होता, त्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रेल्वेमंत्र्यांच्या या ग्वाहीमुळे आता संगमनेर आणि अकोले तालुक्यातील रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

