जनसेवा फाउंडेशनतर्फे १५ हजार रेनकोट व शबनम बॅगचे वाटप
हजारो वारकऱ्यांसाठी पंढरपुरात भव्य निवास व भोजन व्यवस्था
पंढरपूर । झुंझार न्यूज
“वारकरी बांधवांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे. समाजसेवा आणि वारकरी सेवेला विखे पाटील परिवाराने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले असून, आषाढी वारीच्या निमित्ताने ही ४० वर्षांची सेवाभावाची परंपरा अधिक सक्षमपणे पुढे सुरू ठेवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. यानंतर त्यांनी पंढरपूर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या भक्तनिवास मठात मुक्कामी असलेल्या विविध दिंड्यांना भेटी दिल्या आणि वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

१५ हजार वारकऱ्यांना साहित्याचे वाटप
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनच्या वतीने यंदाही वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. वारीदरम्यान पाऊस आणि प्रवासाची अडचण लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते १५ हजारांहून अधिक रेनकोट आणि शबनम बॅगचे वाटप करण्यात आले. हे साहित्य मिळाल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

७ हजार चौरस फुटांचा भव्य मंडप व निवास व्यवस्था
अहिल्यानगर, नाशिक आणि राज्यातील इतर भागांतून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्मृती मंडळाच्या वतीने सुमारे ७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा भव्य मंडप व भक्तनिवास उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथे सध्या ४० हून अधिक दिंड्यांमधील हजारो वारकरी मुक्कामी आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्यासाठी निवास, शुद्ध पिण्याचे पाणी, सकस भोजन, स्वच्छतागृहे आणि चोवीस तास वैद्यकीय सेवा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पुरविली जात आहे.

४० वर्षांचे अविरत सेवाव्रत
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “वारकरी २०-२५ दिवस पायी प्रवास करून विठूरायाच्या दर्शनाला येतात. त्यांच्या सेवेत कोणतीही उणीव राहू नये, हीच आमची भूमिका आहे. ही सेवा विखे पाटील परिवार गेल्या ४० वर्षांपासून अविरतपणे करत आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या कामाचे फळ आहे.”
पंढरपूरमधील या भव्य सेवा उपक्रमासाठी स्वयंसेवकांची मोठी फौज चोवीस तास कार्यरत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत, विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने सर्वांचे जीवन सुखमय होवो, अशी भावना व्यक्त केली .
Post Views: 19

