पानोडी । झुंझार न्यूज

येथील बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पानोडी व आश्वी येथे ‘जागतिक आंबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ फळांचा राजा म्हणून आंब्याचा आस्वाद न घेता, भावी पिढीने पर्यावरणाचे रक्षण करावे या उद्देशाने विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा जास्त आंब्याच्या कोयांचे पिशवीत रोपण करून आगळावेगळा उपक्रम राबवला.


जागतिक आंबा दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या आंब्याच्या कोयी संकलित केल्या होत्या. या कोयी पिशव्यांमध्ये खत व माती टाकून लावण्यात आल्या. या उपक्रमातून ४०० ते ५०० रोपांची नर्सरी तयार करण्यात आली आहे. शाळेला भेट देणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हे आंबा रोप भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, जेणेकरून समाजात वृक्षारोपणाचा संदेश जाईल, असा संकल्प चिमुकल्यांनी केला आहे.


शाळेच्या आवारात वर्षभरातून दोनदा फळे देणारे एक वैशिष्ट्यपूर्ण आंब्याचे झाड आहे. सध्या आंब्याचा मुख्य हंगाम संपलेला असतानाही या झाडाला पुन्हा मोहोर येऊन कैऱ्या लागल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या झाडाला प्रत्यक्ष भेट देऊन त्याचे निरीक्षण केले. हंगाम नसतानाही झाड कैऱ्यांनी बहरलेले पाहून विद्यार्थ्यांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले होते. शिक्षकांनी त्यांना या झाडाविषयी सविस्तर माहिती दिली.

या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेत ३० ते ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आंब्याचे विविध प्रकार, रंग, चव आणि ‘फळांचा राजा’ म्हणून त्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. तसेच विद्यार्थ्यांनी आंब्यावरील कविता आणि घोषवाक्ये सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आंब्यातील पोषक तत्त्वांविषयी मार्गदर्शन केले. आंब्यामध्ये जीवनसत्त्व ए, सी आणि ई तसेच तंतुमय घटक व खनिजे मुबलक प्रमाणात असतात. आंब्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढते आणि शरीर सुदृढ राहण्यास कशी मदत होते, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.


हा संपूर्ण उपक्रम बालपण स्कूलच्या प्रमुख सौ. सोनाली मुंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *