पांडुरंगाच्या कृपेने अलनिनोचा धोका टाळला

संगमनेर मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी
संगमनेर । झुंझार न्यूज
पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आणि सर्व भोळ्या भक्तांचे आराध्य दैवत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कृपेने यावर्षी अलनिनोचा धोका कमी होऊन चांगला पाऊस झाला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. ईश्वर कृपेने राज्यातील सर्व नागरिक सुखी समाधानी आणि आनंदी होऊ दे अशी प्रार्थना करताना आषाढी वारी हा अध्यात्माचा सोहळा समतेचा आणि एकतेचा असून जगासाठी मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन मा.महसूल मंत्री तथा मा. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर मधील चैतन्य नगर येथे विठ्ठल मंदिरात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी समवेत मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, गणेश मादास, ह.भ.प.मधुसूदन गिरी, किशोर टोकसे,सोमेश्वर दिवटे, वैष्णव मुर्तडक, गजेंद्र अभंग, निखिल पापडेजा, तुषार शिंदे,सौरभ कासार, भारत बोराडे, संजय गाडे, डॉ.अनुराधा सातपुते,आशिष कोठवळ, सौ.अर्चना दिघे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आषाढी वारी हा महाराष्ट्रातील अध्यात्माचा मोठा सोहळा आहे. या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. संत महंतांचा समतेचा आणि मानवतेचा विचार वारकरी संप्रदायांनी पुढे नेला आहे. यामध्ये लहान थोर कोणीही नाही. लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र येतात आणि गुण्यागोविंदाने भक्ती भावाने वारी पूर्ण करतात .हा एकतेचा आणि समतेचा सोहळा संपूर्ण जगासाठी दिशादर्शक आहे.

यावर्षी अलनिनोमुळे दुष्काळाची मोठी भीती होती. परंतु पांडुरंगाच्या कृपेने यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी असेल तर शेतकरी नागरिक आनंदी व समाधानी असतात. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे,आढळा भोजापूर ही सर्व धरणे भरली आहेत. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. लाखो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी गेले आहेत. संगमनेर मध्ये सुद्धा विठ्ठल मंदिर परिसरामध्ये प्रति पंढरपूर अवतरले आहे. यापुढील काळातही सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी सर्वसामान्य नागरिक आनंदी होऊ दे अशी प्रार्थना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, मानवता हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे. साधुसंतांनी समाज सुधारकांनी हा धर्म आपल्या सर्वांना सांगितला आहे परंतु सध्या समाजामध्ये अंधश्रद्धा आणि धार्मिक वाद वाढत असून अत्यंत दुर्दैवी आहे. समतेचा आणि समाजाच्या विकासाचा विचार आपल्या सर्वांना पुढे नेण्यासाठी काम करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आषाढी वारी हा आनंदाचा सोहळा आहे. लाखो लोक अत्यंत आनंदाने पायी पंढरीला यावेळी जातात. टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर हा प्रत्येकासाठी अत्यंत सुखद क्षण असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी सौ.दुर्गाताई तांबे व नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या.

संगमनेर शहरांमध्ये विविध महाविद्यालय शाळा यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी दिंड्या काढत एकादशी साजरी केली हरिनामाच्या गजरात आणि विठू माऊली च्या गजरात यावेळी संपूर्ण संगमनेर शहर भक्तीमय झाले होते.
Post Views: 7

