संगमनेर । झुंझार न्यूज
नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ही प्रस्तावित संगमनेर मार्गे झाली पाहिजे ही मागणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे व संगमनेर तालुक्यासह अकोले तालुक्यातील जनतेने आग्रहाने केली आहे. या मागणीसाठी आता संगमनेर तालुक्यातील विद्यार्थी सरसावले असून त्या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहेत
नाशिक पुणे रेल्वे भावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आणि यातून संगमनेर नारायणगाव खेड अशी रेल्वे मंजूर झाली. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या जमिनीचा मोबदलाही देण्यात आला. मात्र त्यानंतर सरकार बदलले आणि रेल्वे मार्गही बदलला हा रेल्वे मार्ग बदलल्या गेल्यानंतर संगमनेर तालुक्यामध्ये आक्रमक आंदोलने झाली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा केला.
ही रेल्वे मूळ प्रस्तावित मार्गानेच, म्हणजे नाशिक-सिन्नर-संगमनेर- अकोले-नारायणगाव मार्गे पुण्याला जावी, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
या मागणीला आता जनआंदोलनाचे स्वरूप येऊ लागले असून संगमनेर येथील सुमारे 15000 विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून आपल्या हक्काच्या मार्गासाठी आवाज उठवला आहे. स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे स्वागत होत असून विकासाच्या समतोल दृष्टीने हा मार्ग कायम ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
या मागणीवरून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली असून ही रेल्वे संगमनेर वरूनच व्हावी अशी आग्रही मागणी केली आहे त्याचबरोबर आमदार सत्यजित तांबे यांनी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घारगाव येथे आयोजित करून शासनाने सर्व लोकप्रतिनिधी व जनतेच्या मागणीचा विचार करून नियोजित संगमनेर मार्गेच रेल्वे करावी अशी आग्रही मागणी केली आहे.

दरम्यान, आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेरकरांसह पुणे नाशिक सरळ मार्गे रेल्वे दरम्यान येणाऱ्या परिसरातील नागरिकांना लोकशाही मार्गाने आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
