श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांचा स्तुत्य उपक्रम

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी मेळावा व शेतकरी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञान, पशुपालन आणि शासकीय योजनांबाबत तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

 

या प्रसंगी गावाचे सरपंच ॲड. विकास गुंजाळ, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रमेश गुंजाळ, मॅनकाइंड फार्माचे (संगमनेर विभाग) ए.एस.एम. मनीष देशमुख, बी.एस.ओ. सौरभ भड, प्रगतशील शेतकरी आदित्य खेमनर, कृषी सहाय्यक अधिकारी सौ. ए.डी. आंबरे, तसेच महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. के.आर. शिंदे आणि प्रा. ए.डी. गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मॅनकाइंड फार्माचे मनीष देशमुख यांनी शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील बारकावे समजावून सांगत पशुपालनासोबतच दुभत्या जनावरांची आरोग्य निगा, वेळोवेळी करावयाचे लसीकरण आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक पद्धतींवर त्यांनी प्रकाश टाकला. तर प्रगतशील शेतकरी आदित्य खेमनर यांनी आधुनिक शेतीची कास धरण्याचे आवाहन करत कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे, खते व कीडनाशकांचा संतुलित वापर आणि शेतीमाल पिकवल्यानंतर योग्य बाजारपेठ कशी शोधावी, याबद्दल स्वतःचे अनुभव सांगितला .

यावेळी कृषी सहाय्यक अधिकारी सौ. ए.डी. आंबरे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध शेतकरी हिताच्या योजनांची माहिती दिली. कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन अनुदान आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक नफ्याची कशी करता येईल, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, रमेश गुंजाळ यांनी दूध उत्पादन वाढीसाठी सहकार क्षेत्राचे योगदान आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ॲड. विकास गुंजाळ यांनी कृषीदुतांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांना थेट बांधावर नवीन तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती मिळते, असे सांगून त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed