संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील म्हसे वस्ती येथे ‘हर हर महादेव’च्या जयघोषात ६ व्या शिवरात्री सप्ताहाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. निळकंठेश्वर मित्र मंडळ व दिग्विजय गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने शनिवार दि. १४ फेब्रुवारी ते सोमवार १६ फेब्रुवारी २०२६ या काळात हा भक्तिसोहळा पार पडणार आहे.
म्हसे वस्ती येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात होणाऱ्या या सप्ताहात दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. १४ फेब्रुवारी: सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आळंदी येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. गुरुदेव महाराज चव्हाण यांचे कीर्तन होईल. या कीर्तनाचे सौजन्य वैभव एकनाथ ताजणे व सचिन एकनाथ ताजणे (कै. एकनाथ सखाराम ताजणे यांच्या स्मरणार्थ) यांनी केले आहे. या दिवशीचे अन्नदाते प.डॉ. विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक विजय काशिनाथ म्हसे हे आहेत.
रविवार दि. १५ फेब्रुवारी: सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक येथील ह.भ.प. शिवानंद महाराज पाटील आपल्या रसाळ वाणीतून कीर्तन सेवा सादर करतील. या कार्यक्रमाचे सौजन्य प्रवीण शिवाजी उंचरकर, दत्तात्रय महादू वाघमारे व रवींद्र नानासाहेब ताजणे यांनी लाभले आहे. या दिवशी विनोद दत्तात्रय कोरे (मुंबई) व सौ. पूजा विनोद कोरे (म्हसे) यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.
सोमवार दि. १६ फेब्रुवारी: सप्ताहाची सांगता शिर्डी (पिंपळवाडी) येथील भगवान श्री सोमेश्वर देवस्थानचे महंत मधुसूदन गिरीजी महाराज यांच्या कीर्तनाने होईल. या दिवसाचे कीर्तन सौजन्य गिताराम दशरथ गायकवाड (भापती) व संतोष त्र्यंबक म्हसे यांनी दिले आहे. या सांगतेच्या दिवशी राजेंद्र विठ्ठल मरकड (मढी) व सौ. शितल राजेंद्र मरकड (म्हसे) यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी निळकंठेश्वर मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, अमृता ज्वेलर्स प्रा.लि. यांनी फ्लेक्स सौजन्य दिले आहे. म्हसे वस्ती आणि आश्वी परिसरातील सर्व शिवभक्तांनी आणि भाविकांनी या तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निळकंठेश्वर मित्र मंडळ व दिग्विजय गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.