संगमनेर । झुंझार न्यूज 

 


मायाळू स्वभाव, सामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि अहोरात्र लोकसेवेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रखुमाऊली’ डॉ. जयश्री ताई बाळासाहेब थोरात यांचा आज जन्मदिवस. आपल्या कर्तृत्वाचा ठसा केवळ तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरही उमटवणाऱ्या ताईंच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

 

आदरणीय साहेबांच्या शिकवणीचा वारसा


‘प्रत्येकाची मदत करणे ही आपली जबाबदारी आणि प्रत्येकाची काळजी ही आपल्या कुटुंबातील सदस्याची काळजी’ ही आदरणीय बाळासाहेब थोरात (साहेबांची) शिकवण डॉ. जयश्री ताईंनी आपल्या जीवनात तंतोतंत उतरवली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या मदतीसाठी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ताईंचा स्वभाव प्रत्येकाच्या मनात घर करणारा आहे. त्यांच्या कार्यामुळे आज हजारो युवकांसाठी त्या एक ‘मोठी बहीण’ आणि अबालवृद्धांसाठी ‘रखुमाऊली’ बनल्या आहेत.

 

 

उच्चशिक्षित वैद्यकीय तज्ञ ते जनसेवेची वारी


डॉ. जयश्री ताई या एक उच्चशिक्षित कॅन्सर तज्ञ (कर्करोग तज्ञ) आहेत. आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा उपयोग त्यांनी केवळ करिअरसाठी न करता, गोरगरिबांचे आरोग्य सुधारण्यासाठी केला आहे. महिलांच्या आरोग्याबाबत त्या विशेष जागरूक असून, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि योग्य सल्ला देतात. जुन्या आणि नव्या विचारांची सांगड घालत, अध्यात्माची ओढ जपणारे हे नेतृत्व आषाढी वारीच्या माध्यमातून तरुण पिढीलाही संस्कृतीशी जोडून ठेवत आहे.

महिला सबलीकरण आणि युवा विकासाचा ध्यास


महिलांच्या हाताला काम मिळावे, त्या स्वावलंबी व्हाव्यात आणि कुटुंबाचा आधार बनाव्यात, यासाठी ताई सतत धडपडत असतात. महिला सबलीकरणाची ज्योत त्यांनी आपल्या कार्यातून सतत तेवत ठेवली आहे. केवळ महिलाच नव्हे, तर युवकांनीही पारंपरिक शेतीला आधुनिक जोडधंद्यांची जोड देऊन प्रगती करावी, यासाठी त्या नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या शोधात असतात आणि युवकांना प्रोत्साहित करतात.

‘पर्व एकविरेचे’ : परिवर्तनाची नवी वाट


ताईंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. “आबांच्या विचारधारेचे आणि परिवर्तनाच्या वाटेवरचे हे पर्व” असल्याची भावना युवक व्यक्त करत आहेत. अध्यात्म, समाजसेवा, आरोग्यसेवा आणि विकासाची दृष्टी यांचा संगम डॉ. जयश्री ताईंच्या रूपाने पाहायला मिळतो.

वैद्यकीय सेवेतून सुरू झालेली ही जनसेवेची वारी अशीच अविरत सुरू राहो आणि ताईंना उदंड आयुष्य लाभो, अशा सदिच्छा यावेळी त्यांचे स्नेही सागर किसन हासे व तमाम जनमानसातून व्यक्त केल्या जात आहेत.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *