साधारणपणे एक वर्षांपूर्वी जयाने एकविरा फौंडेशन सुरू केले. समाजाप्रती आपले काहीतरी देणं लागत आणि आपण ते काम निस्वार्थीपणे केलेच पाहिजे, ही नेहमी तिची भावना असते. सुरवातीच्या काळात मुलीच्या आरोग्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन ‘आरोग्यसाधना’ हा कार्यक्रम हाती घेतला. वाडीवस्तीवर पोहचून तिने प्रत्येक मुलीला आपल्या आरोग्याबद्दल माहिती दिली. यातून अनेक मुली तिच्याशी जोडल्या गेल्या. तालुक्यातील अनेक शाळेवर स्वतः जाऊन मुलींशी हितगुज करून वेळप्रसंगी त्याचा डब्बा खाऊन ती त्यांची एक डॉक्टर मैत्रीण झाली. मुली देखील तिच्याशी मनमोकळ्या बोलू लागल्या.
हे सुरू असताना गणेशवीसर्जन कार्यक्रम हाती घेतला. एकदम शिस्तबद्ध पद्धतीने गणपती स्वीकाराऊन त्याचे विसर्जन केले. मला वाटते त्याकाळी एक देखील जीवितहानी किंवा अनुचित प्रसंग संगमनेरमध्ये घडला नाही. हेच एकविरा फौंडेशनच्या कामाचे यश म्हणावे लागेल.
या नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी आनंदाने केले. परंतु एक कोरोना नावाचा आजार आला आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य काही महिन्यांसाठी जागच्या जागी थांबलं. तेव्हा देखील एकविरा फौंडेशन डॉक्टरांच्या मदतीला धावले. स्वतः डॉक्टर आहे आणि ती पूर्णवेळ टाटा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करत होती. त्याचवेळी तिच्या सहकारी या संगमनेरमध्ये ज्या गोष्टी रुग्णांसाठी आवश्यक आहेत त्या पुरवल्या. कोरोनाचा काळात गणपती विसर्जनासाठी शासकीय कर्मचारी याना मास्क, फेसशिल्ड आणि ग्लोज अश्या अनेक गोष्टी पुरवून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

परंतु या कालावधीत हातावर पोट असणाऱ्या लोकांची मात्र अवस्था बिकट झाली. विशेषतः आपल्या संसाराची आर्थिक धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या महिलावर्गाला याचा मोठा फटका बसला. कोरोना संकटकाळात ठप्प झालेलं आपलं जीवनमान हळूहळू रुळावर येत असताना आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती दिवाळीची. याच उत्सुकतेपोटी एकविरा फौंडेशन एक दिवा सक्षमतेचा लावू पाहतोय या महिलावर्गासाठी. या दिव्याच्या प्रकाशात एकविरा मार्केट मार्फत आपल्या लेकींचं आयुष्य उजळविण्याचा प्रयत्न त्या करणार आहोत.

सामाजिक बांधिलकीचे भान राखत दि. 6 नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत शेतकी संघ येथे एकविरा मार्केटचे आयोजन केले आहे. येथे तुम्हाला ज्या महिलांच्या व्यावसायला व्यासपीठ नाही पण काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात आहे अशा महिलांना व महिला बचत गटांना विनाशुल्क स्टॉल उपलब्ध करून दिले आहे. येथे तुम्हाला अनेक घरगुती बनवलेल्या विविध खाद्यपदार्थ तसेच उत्पादनांचा लाभ घेता येणार आहे.
तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा हा उत्सव महिलावर्गाच्या आयुष्याला भरारी देणारा वाटतो. त्यासाठी तुमची साथ एकविरा फौंडेशनला नेहमीच महत्वाची वाटते. त्या फक्त तुम्ही येण्याची वाट पाहताय. चला तर त्यांच्या एकविरांच्या भूजांना बळ देऊयात..!
मेहनतीच्या हातांना, एकविराची साथ.
आपल्या दिवाळीतुन, त्यांना एक गोड घास.
दिलीप बांबळे ( यशोधन कार्यालय )

