नारायणगाव जवळील ‘१४ नंबर’ येथे भीषण अपघात
राहाता । झुंझार न्यूज
स्वतःच्या कष्टाने आणि जिद्दीने पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगून निघालेल्या एका होतकरू तरुणाचा वाटेतच काळाने घाला घातला. पुणे येथे पोलीस भरतीसाठी जात असताना नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील साईकीरण भागवत शेलार (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरी निर्मळ गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी निर्मळ येथील साईकीरण शेलार हा तरुण पुणे येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आपल्या एका मित्रासह शुक्रवारी दुचाकीवरून निघाला होता. प्रवासादरम्यान, नारायणगाव हायवेवरील ‘चौदा नंबर’ परिसरात एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये साईकीरणला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

साईकीरण हा पिंपरी निर्मळ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे लिपिक भागवत शेलार यांचा मुलगा होता. तो अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि गावात सर्वांशी आपुलकीने वागणारा तरुण म्हणून परिचित होता. घराची परिस्थिती सावरण्यासाठी आणि आई-वडिलांचे नाव रोशन करण्यासाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र, भरती स्थळावर पोहोचण्यापूर्वीच वाटेत झालेल्या अपघाताने त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
शनिवारी सकाळी साईकीरणचे पार्थिव पिंपरी निर्मळ येथे आणण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव सुन्न झाले होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, धाकटा भाऊ आणि चुलते असा परिवार आहे. कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या साईकीरणच्या जाण्याने शेलार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघातामुळे पोलीस भरतीसाठी धावपळ करणाऱ्या तरुणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महामार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


