मुंबई । झुंझार न्यूज
भारतीय जनता पक्षाने आगामी काळातील निवडणुका आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेऊन आपल्या प्रदेश कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत. यात अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे नेते आणि मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

पक्षाने दाखवलेल्या या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान आहे. राज्याचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन.

या सदिच्छा भेटीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीषजी महाजन, माजी केंद्रीय मंत्री सौ. भारतीताई पवार, माजी खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ही जबाबदारी केवळ एक पद नसून ती जनतेची आणि कार्यकर्त्यांची सेवा करण्याची संधी आहे. “प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पक्षाच्या विचारधारेप्रती पूर्ण बांधिलकी ठेवून, पक्षाला व कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाण्याचा माझा मानस आहे. पक्षसंघटना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नगरसह राज्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याने विशेषतः अहमदनगर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीचा आणि दांडग्या जनसंपर्काचा फायदा आगामी काळात पक्षविस्तारासाठी होईल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे
