आमचं नाणं खणखणीत असल्यामुळेच आज संगमनेर तालुक्यात पाण्याचा खळखळाट पाहायला मिळत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील रखडलेली विकासकामे मार्गी लागत असून, भविष्यात तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचे (MIDC) कामही प्राधान्याने पूर्ण करू,” अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुमारे १ कोटी रुपयांच्या निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील ‘एस्केप’मधून पाणी सोडण्याच्या कामाचा आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, राष्ट्रवादीचे कपिल पवार, प्रमोद राहाणे, काशिनाथ पावसे, गुलाब भोसले, राम जाजू, जनार्दन आहेर, सुशील शेवाळे, रोहित चौधरी, राजन शिंदे, संदीप घुगे यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी नियोजनावर भर आणि ‘दुष्काळी मॉडेल’ला पूर्णविराम
मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, “निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदा धरणात पाणीसाठा उपलब्ध असला तरी ‘अल निनो’च्या संकटामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंतच्या पाण्याचा आढावा घेऊनच पुढील नियोजन केले जात आहे. पूर्वी संगमनेर तालुका ‘दुष्काळी मॉडेल’ म्हणून ओळखला जायचा, मात्र महायुती सरकार आल्यापासून आणि आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज तालुक्यात टँकरची गरज भासत नाही. वर्षानुवर्षे पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या गावांना पाणी मिळाल्याचे मोठे समाधान आहे
तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना मंत्री विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “इतकी वर्षे फक्त भाषणे ऐकली, पण आता तालुका प्रत्यक्ष विकासातून प्रकाशमान होत आहे. मागील वर्षभरात दिलेले प्रत्येक आश्वासन आम्ही पूर्ण करत आहोत. राज्यात ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असून, संरक्षण उत्पादनात अहमदनगर जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होत आहे. याच धर्तीवर संगमनेरमध्ये औद्योगिक विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
आमदार अमोल खताळ यांचा आक्रमक पवित्रा
यावेळी आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरमधील परिवर्तनावर जोर दिला. ते म्हणाले की, “नामदार विखे पाटील यांनी संगमनेरचे पालकत्व स्वीकारल्यामुळेच आज प्रत्येक अडचण सुटत आहे. चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील पुलाचे काम असो किंवा गावागावांत मिळणारा निधी, हे सर्व महायुती सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. काही लोक कामांबाबत शंका उपस्थित करत असले, तरी जनतेला आता सत्य कळून चुकले आहे. तरुणांसाठी औद्योगिक वसाहतीची जागा लवकरच निश्चित केली जाईल.
हिवरगाव पावसा येथील बंधाऱ्यात आलेले पाणी आणि सुमारे ३ कोटी रुपयांच्या पुलाचे काम आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे संगमनेर तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.