आश्वी । झुंझार न्यूज
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांची राज्यसभा खासदार म्हणून सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. विजयाची ही ऐतिहासिक ‘हॅट्ट्रिक’ साधल्यानंतर डॉ. आठवले हे प्रथमच रविवारी, ८ मार्च २०२६ रोजी शिर्डी दौऱ्यावर येत असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी दिली आहे .

या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत ते काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. रामदास आठवले हे शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा शिर्डीत दाखल होतील. साईबाबांच्या नगरीत त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, ८ मार्च रोजी सकाळी त्यांच्या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रमांना सुरुवात होईल.
रविवार, ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता शिर्डी येथे डॉ. रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि आगामी राजकीय घडामोडींवर ते काय भाष्य करतात, याची मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. याच ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते शिर्डीत जमा होणार आहेत. शिर्डीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी डॉ. आठवले हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर दौऱ्यासाठी रवाना होतील.

रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी आणि लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिर्डीत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भिमा बागुल, पप्पू बनसोडे, आशिष शेळके व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

डॉ. आठवले यांची ही हॅट्ट्रिक रिपब्लिकन चळवळीसाठी ऊर्जा देणारी ठरली असून, त्यांच्या शिर्डी दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Post Views: 618

