आश्वी खुर्द । झुंझार न्यूज
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आश्वी खुर्द येथील ‘आर एफ कॉम्प्युटर एज्युकेशन’ संस्थेमध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत उपस्थित महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ. सुजाता भडकवाड व सौ. काजल भडकवाड या होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आश्वी खुर्दच्या मुख्याध्यापिका सौ. सविता भुसाळ आणि आश्वी महाविद्यालयाच्या डॉ. सौ. रोहमारे उपस्थित होत्या.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. सविता भुसाळ यांनी महिलांनी स्वतःच्या हक्कांप्रती जागरूक राहून आत्मनिर्भर होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. सौ. रोहमारे मॅडम यांनीही महिलांच्या समाजातील योगदानावर प्रकाश टाकत आपले प्रेरणादायी विचार मांडले. विद्यार्थिनींच्या वतीने कु. प्रतिक्षा कदम हिने मनोगत व्यक्त करत महिला दिनाचे महत्त्व विशद केले.
संस्थेच्या संचालिका सौ. सुजाता भडकवाड यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये MSCIT आणि KLICK कोर्सेससह महिलांसाठी खास डिझाइन केलेल्या ‘डिजिटल सहेली’ या कोर्सबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. महिलांनी तंत्रज्ञानाच्या प्रवाहात मागे राहू नये, हा या कोर्सचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंटर को-ऑर्डिनेटर श्री. सागर भडकवाड यांनी आजच्या युगात बदलत्या तंत्रज्ञानावर भाष्य केले. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे वाढते महत्त्व आणि सायबर क्षेत्रातील वाढते धोके लक्षात घेता सायबर सुरक्षिततेचे (Cyber Security) धडे दिले. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी रिकाम्या वेळात संगणक साक्षर होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘MSCIT’ कोर्स जास्तीत जास्त संख्येने करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास आश्वी महाविद्यालयाच्या डॉ. सौ. जाधव मॅडम, प्रा. सौ. वाणी मॅडम, प्रा. कु. त्रिभुवन मॅडम, आशा स्वयंसेविका को-ऑर्डिनेटर सौ. मंगल जोशी, आशा सेविका सौ. छाया फुणगे, सौ. कडुबाई तक्ते, श्रीमती सुनिता मुजगुडे, अंगणवाडी सेविका सौ. विमल गव्हाणे, सौ. जया कांबळे, सौ. छाया ससाणे, सौ. सुनिता कचेरिया, सौ. सुनिता तळोले, सौ. संगिता गायकवाड, सौ. संगिता कचेरिया, सौ. मंगल गोसावी, सौ. सुनिता मंडलिक, सौ. कल्पना राक्षे यांच्यासह विद्यार्थिनी सिद्धिका वर्पे, अक्षदा काळे, संध्या विटनोर, कोमल शिंदे, वनिता गिते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


