संगमनेर । झुंझार न्यूज

 

समाजात अशी काही व्यक्तिमत्त्वं असतात, जी केवळ स्वतःच्या उन्नतीचा विचार न करता आपला संपूर्ण देह आणि आयुष्य समाजाच्या हितासाठी अर्पण करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे, अन्यायाविरुद्ध ढाल बनून उभे राहणारे आणि गोरगरिबांच्या जीवनात प्रकाशाची पेरण करणारे एक नाव म्हणजे श्री. विनोद लक्ष्मण गायकवाड. त्यांच्या बहुआयामी कार्यामुळे आज अनेक समाजघटकांना न्याय मिळाला असून, हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य सावरले आहे.

विनोद गायकवाड यांची खरी ओळख म्हणजे ‘अन्यायाविरुद्ध लढणारा एक झुंजार कार्यकर्ता’. जिथे जिथे सर्वसामान्यांवर अन्याय किंवा अत्याचार होतो, तिथे विनोद सर हक्काने धावून जातात. विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच प्रशासनाला जाब विचारत सामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. केवळ आंदोलनेच नाही, तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आजवर २५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात घरात बंद होते, तेव्हा विनोद गायकवाड रस्त्यावर उतरून सेवा करत होते. त्यांनी केवळ गरजूंच्या भोजनाची व्यवस्था केली नाही, तर माणुसकीचे अत्युच्च दर्शन घडवत बेवारस मृतदेहांवर सन्मानाने अंत्यसंस्कार केले. त्यांच्या या कार्यामुळे समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकच आदराचा झाला.

 

 

गावाचा विकास हाच देशाचा विकास, हा ध्यास घेऊन २००७ ते २०१२ या काळात त्यांनी निंबाळे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून बिनविरोध काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कॉंक्रिटीकरण, हायमास्ट दिवे, रस्ते आणि स्वच्छता यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे निंबाळे गावाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘निर्मल ग्राम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी: वस्तीगृहातून घडविली पिढी
विनोद सरांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे शिक्षण क्षेत्रातील योगदान. बहुजन शिक्षण संघ, अहमदनगरच्या माध्यमातून त्यांनी कोपरगाव, श्रीगोंदा, राहुरी, संगमनेर आणि घुलेवाडी अशा विविध ठिकाणी वस्तीगृहांची जबाबदारी सांभाळली. वस्तीगृहातील मुलांना त्यांनी केवळ विद्यार्थी मानले नाही, तर पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचे संगोपन केले.

 

त्यांच्या या संस्कारांतून घडलेले विद्यार्थी आज यशाच्या शिखरावर आहेत. कोणी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे क्रूझवर कार्यरत आहे, तर कोणी भारतीय सैन्य (Army), BSF आणि महाराष्ट्र पोलीस दलात देशसेवा करत आहे. अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, वकील आणि क्लास-वन अधिकारी म्हणून समाजात वावरत आहेत. विशेष म्हणजे, ‘रेड लाईट एरिया’ मधील उपेक्षित मुलांच्या जीवनात त्यांनी शिक्षणाचा प्रकाश नेला. ती मुले आज इंजिनिअर आणि अधिकारी होऊन ताठ मानेने जगत आहेत.

शिक्षण आणि समाजकार्यासोबतच धम्मकार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग असतो. भंडारदरा-शेंडी येथील धम्मयात्रा कमिटीमध्ये ते गेल्या १५ वर्षांपासून सक्रिय आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते सामाजिक एकोपा जपण्याचे काम करत आहेत.

 

त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना २०२५ चा ‘सरपंच सेवा संघ सन्मान’ , ‘निंबाळे भूषण’ पुरस्कार ,२०२० चा ‘योद्धा पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, “माझ्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि गोरगरिबांच्या चेहऱ्यावरचे समाधान, हेच माझे खरे पुरस्कार आहेत,” असे विनोद सर अभिमानाने सांगतात.

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या लढवय्या समाजसेवकाला आणि त्यांच्या कार्याला संपूर्ण समाजाचा मानाचा मुजरा!

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *