अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी वेधले लक्ष

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. राज्यातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली.

 

महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रे ही भाविकांसाठी श्रद्धास्थान असून त्याठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देत असतात. ग्रामीण भागातील अशा तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करून त्यांचा विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार खताळ यांनी केली.

विशेषतः हिवरगाव पावसा येथील श्री खंडोबा महाराज (देवगड) देवस्थान हे तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाला दरवर्षी हजारो-लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अलीकडेच राज्य शासनाच्या माध्यमातून या देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणे, मंदिर परिसराचा विकास करणे तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते आणि इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे आमदार खताळ यांनी सभागृहात स्पष्ट केले.

 

तसेच संगमनेर मतदारसंघातील इतर तीर्थक्षेत्रांचाही विकास करण्यात यावा, जेणेकरून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी सभागृहातून केली. या मागणीमुळे संगमनेर मतदारसंघातील धार्मिक स्थळांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यास स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल, असे मतही व्यक्त केले जात आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *