छेडछाड रोखली तर मंगळसूत्र चोरांच्या आवळल्या मुसक्या
नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या संकल्पनेतील ‘रक्षक दल’ अवघ्या तीन दिवसांतच ॲक्शन मोडमध्ये
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने नवनियुक्त करण्यात आलेल्या ‘रक्षक दलाने’ स्थापनेनंतर अवघ्या तीन दिवसांतच आपली चमक दाखवली आहे. एसटी बसस्थानक परिसरात विद्यार्थिनीची छेडछाड करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासोबतच, देवाचा मळा परिसरातील मंगळसूत्र चोरांना पकडून रक्षक दलाने गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे. नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामगिरीमुळे संगमनेरकरांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १३ मार्च) रक्षक दलाचे जवान अकोले बायपास परिसरात अतिक्रमणविरोधी मोहिमेत व्यस्त होते. दरम्यान, एका निनावी फोनद्वारे माहिती मिळाली की, एसटी बसस्थानक परिसरात काही तरुणांमध्ये जोरदार राडा सुरू आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रक्षक दलाने तात्काळ बसस्थानकाकडे धाव घेतली. दलाला पाहताच गोंधळ घालणारे दोन तरुण तेथून पळून गेले.
मात्र, अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. हे तरुण एका विद्यार्थिनीला फोनद्वारे ब्लॅकमेल करत तिची छेड काढत होते. रक्षक दलाने संबंधित विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. यावेळी पळून गेलेल्या मुलांचा मोबाईल घटनास्थळीच पडला होता, तो रक्षक दलाने जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या मोबाईलमुळे छेडछाड करणाऱ्यांचा माग काढणे पोलिसांना सोपे जाणार आहे.

दुसऱ्या एका घटनेत, शनिवारी देवाचा मळा परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रक्षक दलाने तातडीने परिसर पिंजून काढला. संशयास्पदरीत्या पळणाऱ्या दोन तरुणांना दलाने शिताफीने ताब्यात घेतले आणि त्यांना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या हवाली केले.
महिलांच्या सुरक्षेसाठी जागतिक महिला दिनाचे (८ मार्च) औचित्य साधून या विशेष ‘रक्षक दला’ची स्थापना करण्यात आली होती. अवघ्या तीन दिवसांतच या दलाने शाळा, महाविद्यालये आणि वर्दळीच्या ठिकाणी गस्त वाढवून गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे दल चोवीस तास तत्पर आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओंचा बंदोबस्त करणे ही या दलाची प्राथमिकता आहे. नागरिकांनी कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती तात्काळ रक्षक दलाला द्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे.
नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक
संगमनेर शहरात कुठेही महिलांची छेडछाड, चोरी किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिक खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
📞 रक्षक दल संपर्क: ९०६७२७३२७३

