महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने कडक कायदे करा – सरकारकडे मागणी

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

वडगाव पान येथील तेरा वर्षाची मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्यावर अज्ञात इसमाने ॲसिड हल्ला केला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी असून या गुन्हेगाराचा तातडीने शोध लावून त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करताना सरकारने महिलांच्या सुरक्षा बाबत प्राधान्याने कडक कायदे केले पाहिजे अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.

वडगाव पान येथील लहान मुलीवर झालेल्या हल्ल्याची बातमी कळताच डॉ जयश्रीताई थोरात यांनी तातडीने तिची प्रवरा मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली याचबरोबर कुटुंबीयांना धीर दिला.

यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्या संतप्त होऊन म्हणाल्या की झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे अवघ्या तेरा वर्षाच्या लहानग्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला होतो आहे हे किती वाईट आहे. या मुलीच्या  वडिलांचे निधन झालेले आहे .आई अत्यंत गरीब आहे. ही मुलगी मामाकडे राहते .शिक्षण घेते आणि असे असताना शाळा सुटल्यानंतर घरी जाताना रोड वरून कोणीतरी अज्ञात इसमाने या निष्पाप मुलीवर ॲसिड ने हल्ला केला. ही काय दहशत आहे.

राजकारण पक्ष जात धर्म सर्व बाजूला ठेवून अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगार शोधण्यासाठी सर्व नागरिकांनी मदत करावी .प्रशासनाने अधिक सतर्कतेने त्याला तातडीने पकडावे. शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कठीण कायदे केले पाहिजे म्हणजे जेणेकरून गुन्हे करणाऱ्यांना जरब बसेल.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जिथे महिलांचा सन्मान केला जातो .मात्र महाराजांच्या महाराष्ट्रात महिला आणि मुलींचा असा अपमान होत असेल तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय बाब आहे.

आपण मुलींना विविध क्षेत्रांमध्ये पुढे आणण्यासाठी काम करत आहोत संधी देत आहोत मात्र अशा घटना झाल्या तर त्या मुली काय करतील. कशी समानता येईल. कशा मुली पुढे जातील ही सर्व परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

काल संगमनेर तालुक्यातील पठार भागात एका गावामध्ये एका मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर चाकू हल्ला होतो आज तेरा वर्षीय चिमुकलीवर ॲसिड हल्ला होतो. काय दोष आहे या मुलींचा. समाजाने जागृत झाले पाहिजे गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

वडगाव पान येथील लहानग्या मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातून तीव्र निषेध होत आहे.

डॉ जयश्रीताई थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीची भेट घेत दिला आधार

घटनेची माहिती कळताच नियोजित कार्यक्रम सोडून कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी तातडीने ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला उपचारार्थ दाखल केलेल्या प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे जाऊन मुलीची आस्तेवाईकपणे चौकशी केली याचबरोबर मुलीच्या आईला व मामांना धीर दिला. या घटनेतील गुन्हेगारांना शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *