राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या २०२६ च्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अक्षय शिवाजी कर्डिले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठ्या थाटात दाखल केला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘विजयी निर्धार मेळाव्यात’ महायुतीमधील सर्वच घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवत अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले.
महायुतीचे अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण म्हणाले की, “अक्षय कर्डिले हे तरुण आणि तडफदार नेतृत्व असून महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ही पोटनिवडणूक केवळ एका जागेसाठी नसून विकासाच्या राजकारणाला गती देण्यासाठी आहे.”
पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार प्रहार केला. “जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्यासारखा सुशिक्षित उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे आहे. महायुतीची ताकद मोठी असून विजय आपलाच आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याला विधान परिषदेचे सभापती प्रा. रामजी शिंदे, आ. मोनिकाताई राजळे आणि आ. संग्राम जगताप यांनी देखील संबोधित केले. “अक्षय कर्डिले यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे, त्याचा फायदा या निवडणुकीत नक्कीच होईल,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या विजयी निर्धार मेळाव्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. विठ्ठलराव लांघे, आ. अमोल खताळ, आ. काशिनाथ दाते, आ. सुरेश धस, भाजप प्रदेश उपाध्यक्ष कृष्णराव महाडिक, सुभाष पाटील, नगरच्या महापौर ज्योतीताई गाढे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य आणि राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भर उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. “अक्षय कर्डिले पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अक्षय कर्डिले यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेतले आणि या निवडणुकीत जनतेच्या जोरावर विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला.
या शक्तिप्रदर्शनामुळे राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.