नगर । झुंझार न्यूज
शिर्डी परिसरातील वादग्रस्त भोंदू अशोक खरात याच्या आर्थिक फसवणुकीच्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, खरातने केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर चक्क परिवहन विभागातील (RTO) वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आपल्या सख्ख्या नातलगांनाही गंडविल्याचे उघड झाले आहे. समता पतसंस्थेतील तब्बल १०० बँक खात्यांतून ६० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने खळबळ उडाली आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावे दीड कोटींचे व्यवहार
भोंदू अशोक खरातने आपल्या प्रभावाचा वापर करून शासकीय अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढल्याचे दिसत आहे. परिवहन विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत तीन खाती उघडण्यात आली होती. या खात्यांमधून खरातने सुमारे दीड कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भोंदू खरातने आपल्या सख्ख्या नातलगांनाही सोडले नाही. त्यांची कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावे पतसंस्थेत खाती उघडली आणि त्यातून सुमारे एक कोटी रुपयांचे व्यवहार केले. पोलीस तपासात खरातच्या या कृत्यामुळे त्याचे जवळचे नातेवाईकही अवाक झाले आहेत.

१०० बँक खाती आणि ६० कोटींची उलाढाल
समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील व्यवहारांची पोलिसांनी कसून तपासणी केली असता, खरातने ५७ व्यक्तींच्या पॅनकार्ड आणि आधारकार्डचा वापर करून तब्बल १०० खाती उघडल्याचे समोर आले आहे. या सर्व खात्यांमधून आतापर्यंत ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे, यातील २६ खातेदारांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत स्पष्ट केले आहे की, आधार आणि पॅनकार्ड आमचेच असले तरी, खाते उघडण्यासाठी अर्जावर केलेल्या स्वाक्षऱ्या आमच्या नसून त्या बोगस आहेत.

अशोक खरात हा केवळ समता पतसंस्थेपर्यंतच मर्यादित नव्हता, तर त्याचे जाळे इतर बँकांमध्येही पसरलेले आहे. राहाता येथील महाराष्ट्र बँक आणि नाशिकमधील पंजाब नॅशनल बँकेच्या काही खात्यांवर खरात ‘नॉमिनी’ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या संदर्भात पोलिसांनी संबंधित बँकांना पत्र पाठवून माहिती मागवली आहे. तसेच संत नागेबाबा पतसंस्था, राहाता पीपल्स, स्वामी विवेकानंद आणि बुलढाणा अर्बन बँकेकडूनही माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

या सर्व प्रकरणात आता एका जुन्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०२२ मध्ये शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा खरातशी काही संबंध आहे का, याचा फेरतपास करण्याची मागणी त्यांचे नातेवाईक राजेंद्र दिवटे यांनी वकिलामार्फत पोलिसांकडे केली आहे. पोलीस आता या प्रकरणाची कायदेशीर चाचपणी करत असून, लवकरच फेरतपासाचे आदेश मिळण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ पार्गे आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस या ‘खरात फाईल्स’चा सखोल तपास करत आहेत. दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 22
