नोकरीची इनिंग संपली, आता सामाजिक चळवळीची इनिंग सुरू करा; मान्यवरांचे आवाहन
संगमनेर । झुंझार न्यूज
माझे काम हाच माझा खरा वशिला आहे. ३६ वर्षांच्या शासकीय सेवेत मी केवळ रस्ते बांधले नाहीत, तर माणसे जोडली. प्रामाणिकपणा आणि जनहिताची कामे केल्यामुळेच आज मला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रेम मिळत आहे. लोकप्रतिनिधींचा विश्वास संपादन करता आला आणि शेकडो माणसांची ही शिदोरी जमवता आली, हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे,” असे भावूक उद्गार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता संजयकुमार भिमराज गायकवाड यांनी काढले.
संजयकुमार गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त लोणी येथे ‘सेवापूर्ती गौरव सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ , महानंदा राज्य दूध संघाचे चेअरमन राजेश ( आबा ) परजणे आदी मान्यवर उपस्थित होते.
संघर्षातून यशाचे शिखर: डॉ. किरण लहामटे
यावेळी बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, संजयकुमार गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि जिद्दीने उच्च शिक्षण घेत हे पद गाठले. त्यांच्या कार्यकाळात अकोले तालुक्यात रस्त्यांचे मोठे जाळे विणले गेले, ज्याचा फायदा ग्रामीण भागाला झाला. त्यांची शासकीय नोकरीची इनिंग आता संपली असली तरी, समाजासाठी काम करण्याची ‘सामाजिक इनिंग’ आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे, अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांनी गायकवाड यांच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक केले. ते म्हणाले, “आजच्या काळात अधिकारी अनेकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेले असतात. मात्र, गायकवाड यांच्या संपूर्ण ३६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर एकही डाग लागला नाही, ही अत्यंत भूषणावह आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांचे योगदान विभागासाठी कायम स्मरणीय राहील.”
तत्परता आणि विश्वासार्हता हीच ओळख: आमदार अमोल खताळ
आमदार अमोल खताळ यांनी गायकवाड यांच्या संघर्षाचे कौतुक करताना सांगितले की, गायकवाड हे जमिनीवर पाय असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कामात कमालीची तत्परता आणि विश्वासार्हता होती. निवृत्तीनंतर त्यांनी कुटुंबाला वेळ देतानाच सामाजिक उत्तरदायित्वही जपावे.
सामाजिक चळवळीला ताकद दिली: विजयराव वाकचौरे
अध्यक्षीय भाषणात विजयराव वाकचौरे म्हणाले की, गायकवाड यांनी केवळ नोकरी केली नाही, तर सामाजिक चळवळीलाही नेहमीच ताकद दिली. ते अंतर्मनाने रिपब्लिकन विचारांचे आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी धम्म आणि समाजाचे काम करून उर्वरित आयुष्य सार्थकी लावावे.
कार्यक्रमादरम्यान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देत गायकवाड यांना राजकीय किंवा सामाजिक चळवळीत सक्रिय होण्याचा सल्ला दिला. तसेच राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही फोनवरून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संजयकुमार गायकवाड भावूक झाले, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले होते.
या सोहळ्याप्रसंगी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अभियंता अनिलकुमार चव्हाण, उप अभियंता कांबळे , युवक रिपाई जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , संगमनेर रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके, चंद्रकांत सरोदे, रमेश शिरकांडे, शांताराम संगारे, मुकुंद सुंदर, सोमनाथ गोरे, सौ. ठोंबरे , कळस संरपच राजेंद्र गवांदे , तिगांव संरपच सानप , रिपाई संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार , बापू रणधीर , ॲड बबनराव नाईकवाडी, डॉ भास्करराव नणनवरे यांच्यासह बांधकाम संगमनेर विभागाचे अभियंता वर्पे, डी. के. गायकवाड, माणिक यादव, बाळासाहेब गायकवाड, दिपक धावणे, डॉ संजय कहार आणि मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत गायकवाड परिवाराच्या वतीने करण्यात आले. मोठ्या संख्येने जमलेल्या जनसमुदायामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने ‘लोकसोहळा’ ठरला.