संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यात शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या तब्बल ६ हजार १९८ शिधापत्रिकाधारकांवर (रेशनकार्ड) प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांचे धान्य तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे शासनाच्या दरमहा सुमारे १२४ क्विंटल धान्याची बचत होणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी रसिक सातपुते यांनी दिली आहे.

नेमकी कारवाई कशामुळे ?
शासनाने रेशन कार्डासाठी ठराविक उत्पन्न मर्यादा आणि भौतिक निकष ठरवून दिले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले नागरिकही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले होते. प्रशासनाने केलेल्या छाननीमध्ये खालील कारणांमुळे लाभार्थी अपात्र ठरले आहेत:

१. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
२. ज्यांच्याकडे स्वतःचे चारचाकी वाहन आहे.
३. विविध कंपन्यांमध्ये नोकरीला असलेले कर्मचारी, कंपनीचे संचालक किंवा भागधारक.
४. ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे.
तीन टप्प्यांत राबवली मोहीम
पुरवठा विभागाने ही तपासणी प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तीन टप्प्यांत राबवण्याचे ठरवले आहे:
-
पहिला टप्पा: मृत झालेले लाभार्थी किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे रेशनकार्डमधून वगळण्यात आली आहेत.
-
दुसरा टप्पा: पात्रतेत न बसणाऱ्या कार्डांचे वर्गीकरण ‘एनपीएच’ (केशरी) गटात करण्यात आले असून, त्यांचा धान्यपुरवठा थांबवण्यात आला आहे.
-
तिसरा टप्पा: ज्या कुटुंबांकडे एक हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे, अशांची ग्राममहसूल अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत सखोल चौकशी केली जात आहे.

धान्य बंद, पण इतर योजना सुरू राहणार
या कारवाईबाबत स्पष्टीकरण देताना पुरवठा अधिकारी रसिक सातपुते यांनी सांगितले की, “ज्या रेशनकार्डधारकांचे धान्य बंद करण्यात आले आहे, त्यांच्या कार्डावरील केवळ धान्याचा लाभ थांबवला आहे. मात्र, या कार्डावर मिळणारे इतर शासकीय लाभ, जसे की ‘आयुष्मान भारत योजना’ व अन्य योजना, पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.”

गरजूंना मिळणार हक्काचा घास
अपात्र लाभार्थ्यांमुळे अनेकदा खऱ्या गरजू आणि गरीब कुटुंबांना धान्यापासून वंचित राहावे लागते. आता या कारवाईमुळे दरमहा वाचणारे १२४ क्विंटल धान्य तालुक्यातील खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्वसामान्य स्तरातून स्वागत होत असून, यामुळे रेशनिंग व्यवस्थेतील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
“अपात्र रेशनकार्डधारकांचे धान्य बंद केल्यामुळे दरमहा मोठी बचत होणार आहे. वाचलेले हे धान्य आता खऱ्या गरजू लाभार्थ्यांना वितरित केले जाईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”
— रसिक सातपुते (पुरवठा अधिकारी, संगमनेर)


