गगनगिरी महाराज अखंड नामस्मरण सप्ताहात विचारांचा जागर
आश्वी । झुंझार न्यूज
आजच्या धावपळीच्या युगात माणूस अत्यंत संधीसाधू बनला आहे. त्याला चांगले विचार ऐकायला वेळ नाही आणि ते ऐकण्याची त्याची मानसिक तयारीही नाही. अध्यात्म सांगणे खूप सोपे असते, मात्र ते प्रत्यक्षात आचरणात आणून जगणे अत्यंत कठीण आहे. ज्याप्रमाणे मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसेच मानवाचे जीवन अध्यात्माशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही,” असे परखड मत ज्येष्ठ व्याख्याते व गगनबावड्याचे माजी सरपंच नंदकुमार पवार यांनी व्यक्त केले.
स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित ‘अखंड हरिनाम सप्ताह’ व व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गगनगिरी महाराजांच्या अलौकिक जीवनकार्याचा आणि त्यांच्या कठोर तपश्चर्येचा आढावा घेत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नंदकुमार पवार पुढे म्हणाले की, आज माणसाने स्वतःला गरजांच्या जाळ्यात अडकवून घेतले आहे. वास्तविक, माणसाच्या गरजा या त्याच्या स्वतःच्या हातात असायला हव्यात, मात्र आज परिस्थिती उलटी झाली आहे. अध्यात्माला बदनाम करू नका, तर त्याचा आधार घेऊन जीवन समृद्ध करा. कृतज्ञता व्यक्त करताना कधीही संकोच बाळगू नका, कारण गगनगिरी महाराजांसारख्या संतांच्या सान्निध्यात येताच प्रत्येक आत्मा पावन होतो.
महाराजांच्या कार्याचा गौरव करताना पवार म्हणाले की, गगनगिरी महाराज हे जन्मजात ईश्वरी अवतारातील योगी होते. त्यांनी आयुष्यभर ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता निसर्गाच्या सान्निध्यात कठोर साधना केली. अन्न-पाण्यावाचून त्यांनी केलेली आत्मोन्नतीची साधना थक्क करणारी आहे. वन्य श्वापदांमध्येही त्यांनी ईश्वरी रूप पाहिले आणि त्यांना आपुलकीने सांभाळले. दक्षिण भारतातील त्यांची साधना आणि अष्टांग योगसाधनेतून त्यांनी जगाला अध्यात्माची खरी ताकद दाखवून दिली.
आजच्या काळात बुवा-बाजीचे पेव फुटले असताना, खऱ्या संतांची ओळख पटणे गरजेचे आहे. गगनगिरी महाराजांनी लोकांतात राहण्यापेक्षा एकांतात राहून आत्मसाधनेला महत्त्व दिले. त्यांचे विचार आणि कार्य अजरामर असून ते समाजाला सदैव दिशा देत राहतील, असेही पवार यांनी नमूद केले.
नगर जिल्ह्यात भक्तीचे बीज रोवून हरिनामाचा जागर करण्याचे कार्य गगनगिरी महाराजांच्या कृपेने अविरत सुरू आहे. हा सप्ताह केवळ एक धार्मिक विधी नसून समाजप्रबोधनाचा एक ईश्वरी मेळावा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या व्याख्यानानंतर जयवंत महाराज पाटील (राधानगरी) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सप्ताहाच्या नित्यक्रमात सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ घेण्यात आला. या सोहळ्याला संगमनेर परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.