संगमनेर । झुंझार न्यूज
उद्योग क्षेत्रात आपल्या कतृत्वाने केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार लंडन, ऑस्ट्रेलिया आणि दुबईसारख्या देशांत यशाची पताका फडकवणारे युवा उद्योजक कल्पित विजयराव वाकचौरे यांचा संगमनेर येथे गौरव करण्यात आला. निमित्त होते, तेजस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘संविधान अमृत महोत्सवा’चे.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्स याठिकाणी ४ जून रोजी हा ऐतिहासिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरातील विविध ७५ क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यामध्ये उद्योग जगतातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कल्पित वाकचौरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, अकोले तालुक्याचे आमदार आ. डॉ. किरण लहामटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रपिआ) राज्य सचिव आ. विजयराव वाकचौरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संघराज रुपवते यांसह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
युवकांसाठी कल्पित वाकचौरे ‘रोल मॉडेल’
कार्यक्रमादरम्यान कल्पित वाकचौरे यांच्या प्रवासावर आधारित एका माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. अत्यंत कमी वयात आणि संघर्षातून त्यांनी उद्योग विश्वात जे स्थान निर्माण केले, त्याचे कौतुक सर्वच वक्त्यांनी केले. “कल्पित वाकचौरे यांनी आपली ओळख केवळ देशापुरती मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केली आहे. त्यांचा हा प्रवास महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम युवकांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले .
तेजस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. रवींद्र घोसाळे यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून नागरिक आणि कल्पित वाकचौरे यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ७५ मान्यवरांच्या सत्काराने आणि संविधानाच्या जागरणाने हा सोहळा संगमनेरच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला.
अल्पवधीतच उद्योजकतेचे शिखर सर करणाऱ्या कल्पित वाकचौरे यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 16




