{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आश्वी । झुंझार न्यूज

भारतीय सनातन संस्कृतीत निसर्ग आणि मानव यांचे नाते अत्यंत अतूट आहे. वृक्षवल्ली हे आपले सोयरे असून ते मानवापासून वेगळे नाहीत. आजच्या काळात विज्ञानाने जगात मोठी क्रांती घडवून आणली असली, तरी अध्यात्माशिवाय मानवाला खरी शांतता लाभू शकत नाही. त्यामुळे विज्ञानवादी दृष्टिकोनासोबतच आपली संस्कृती, अध्यात्म आणि शेतीची मुळे जपण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील स्वर्गीय जयंतराव व बाळासाहेब गुंजाळ पाटील (गुंजाळ वस्ती) येथे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त आयोजित प्रवचनमालेत स्वामी नरेंद्राचार्य महाराज बोलत होते. यावेळी निसर्ग, विज्ञान, अध्यात्म आणि संस्कारांचा अनोखा संगम भाविकांना अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण, श्रीगणेश सरस्वती स्तवन, गुरुवंदना आणि आशीर्वचनाने झाली.


वाढत्या प्रदूषणाबद्दल आणि ढासळत्या निसर्ग संतुलनाबद्दल चिंता व्यक्त करताना महाराज म्हणाले की, “वृक्ष हे पृथ्वीचे प्राण आहेत. कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाने ऑक्सिजनचे महत्त्व अनुभवले आहे. त्यामुळे केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.” तसेच, रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. “अन्नासारखे दुसरे परब्रह्म नाही, त्यामुळे अन्नाचा एकही कण वाया घालवू नका आणि अन्नदात्याचा सन्मान करा,” असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.


संतांच्या कार्याचा गौरव करताना महाराज म्हणाले की, राजकारणी केवळ त्यांच्या कारकिर्दीपुरते मर्यादित राहतात, मात्र संतांचे कार्य अजरामर असते. वारकरी संप्रदायाने समाजाला भक्ती, संस्कार आणि लोककल्याणाचा खरा मार्ग दाखवला आहे. ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून तो लोकभाषेतील ज्ञानाचा अथांग सागर आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या कल्याणाची मागणी केली, ते खऱ्या अर्थाने ‘विश्वाचे रत्न’ आहेत. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीतही वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.


हरिनाम सप्ताहाचे महत्त्व विशद करताना महाराज म्हणाले की, “सप्ताह हा केवळ एक उत्सव नसून ती मनाची मशागत करणारा आध्यात्मिक महायज्ञ आहे. हरिनामाच्या गजरामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते.” स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या, हाच खरा मानवधर्म असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या शिक्षण, रक्तदान आणि विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


“स्वतःला विसरा, पण भगवंताला कधीही विसरू नका,” या हृदयस्पर्शी संदेशाने त्यांनी प्रवचनाची सांगता केली. स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या ओजस्वी आणि मधुर वाणीतील हे निरूपण ऐकून उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *