पाथरे । झुंझार न्यूज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून पाथरे बुद्रुक (ता. राहाता) येथे विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे नूतन ‘बुद्ध विहार’ लोकार्पण सोहळा आणि नामवंत प्रबोधनकारांचे समाज प्रबोधन हे असणार आहे.

नामवंतांच्या उपस्थितीत होणार बुद्ध विहार लोकार्पण
सोमवार, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत आळंदी देवाची येथील थोर समाज प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन संपन्न होणार आहे. याच शुभमुहूर्तावर नूतन ‘बुद्ध विहाराचा’ लोकार्पण सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी दुपारी १२:३० ते २:०० या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंती उत्सवाचे स्वरूप भव्य असून, तीन दिवस विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे
१४ एप्रिल (जयंती दिन): सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. सायंकाळी ६ वाजता समाज मंदिर ते बुद्ध विहार अशी भव्य प्रतिमा मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता प्रसिद्ध गायक मा. विलास शिरसाठ यांचा भीम गीतांचा सुश्राव्य संगीतमय कार्यक्रम होणार असून, त्यानंतर महाप्रसाद दिला जाईल.
१५ एप्रिल: उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता समाज मंदिर ते बुद्ध विहार या मार्गावर पुन्हा एकदा भव्य प्रतिमा मिरवणूक काढण्यात येणार आहे.

हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी बुद्ध विहार संयोजन समिती, ब्ल्यू पँथर ग्रुप, माता रमाई महिला मंडळ आणि पाथरे बुद्रुक पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. या मंगलप्रसंगी आणि प्रबोधन सोहळ्याला पाथरे बुद्रुकसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

