गहू, कांदा आणि मका पिके मातीमोल; पंचनामे पूर्ण, आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज 

 

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी आणि चणेगाव परिसरात निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील मुख्य पिके असलेल्या गहू, कांदा आणि मका पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आता पूर्णपणे हवालदिल झाला असून, हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाचे पीक भुईसपाट झाले आहे. जमीनदोस्त झालेल्या गव्हाची काढणी करणे आता शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहे. सोंगणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून, मजुरांकडून प्रती एकर किमान ८ हजार रुपये मजुरीची मागणी केली जात आहे. त्यानंतर मळणीसाठी पोत्यामागे सुमारे ३०० रुपये खर्च येत आहे. एवढा मोठा खर्च करूनही पावसामुळे गव्हाचा रंग बदलल्याने बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये. सध्या चांगल्या गव्हाला २२०० ते २३०० रुपये दर मिळत असताना, नुकसानग्रस्त गव्हाला त्यापेक्षाही कमी दराने विकावे लागत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याची साठवणूक करणे कठीण झाले आहे. ओलाव्यामुळे कांदा सडण्याचा आणि खराब होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच केंद्राच्या धोरणांमुळे निर्यात घटल्याने बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने, शेतातील पीक काढावे की शेतातच सडू द्यावे, अशा मनस्थितीत शेतकरी अडकला आहे.

 

 

पालकमंत्र्यांना साकडे आणि पंचनाम्यांची कार्यवाही

 

या गंभीर परिस्थितीची दखल घेत झरेकाठी येथील ‘जनसेवा युवा मंच’च्या सदस्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगून पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे व शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्याचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनाची दखल घेत महसूल आणि कृषी विभागाने बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहेत. आता प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या पदरात कधी पडणार, याकडे झरेकाठी आणि परिसरातील बळीराजाचे डोळे लागले आहेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *