वाणी कुटुंबाच्या उच्चशिक्षित पिढीचा नवी झेप!
संगमनेर । झुंझार न्यूज
समाजासमोर एक आदर्श ठेवायचा असेल, तर तो वाणी कुटुंबासारखा! संगमनेरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आज एक नवी सुवर्णगाथा लिहिली गेली आहे. स्वर्गीय चंद्रभान गोविंद वाणी यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या वाणी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांनी आज आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली आहे. संगमनेर बस स्टँड शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ‘विठाई दातांचा दवाखाना’ आणि ‘प्रांगण आर्किटेक्ट’ या दोन भव्य दालनांचे उद्घाटन महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.
संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्टँड शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी उत्साहाचे वातावरण होते. निमित्त होते, वाणी कुटुंबातील दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या शुभारंभाचे. ह.भ.प. महंत बालब्रह्मचारी दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते ‘विठाई दातांचा दवाखाना’ आणि ‘प्रांगण आर्किटेक्ट’ या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाणी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उच्चशिक्षण आणि संस्कारांची सांगड घातली की यश कसे मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाणी कुटुंब! कै. चंद्रभान गोविंद वाणी यांचे चिरंजीव डॉ. पोपटराव वाणी, मधुकर वाणी आणि शांताराम वाणी यांनी आपल्या मुलांना दिलेले दर्जेदार शिक्षण आज फळाला आले आहे.

डॉ. प्रशांत पोपटराव वाणी (MDS Pido) हे ‘विठाई दातांच्या दवाखान्या’च्या माध्यमातून आधुनिक दंतवैद्यकीय सेवा आता संगमनेरकरांना देणार आहेत.
तर, चि. विवेक शांताराम वाणी (B.Arch) यांनी आपल्या कल्पकतेतून ‘प्रांगण आर्किटेक्ट’ या वास्तुविशारद कार्यालयाची स्थापना केली आहे.

केवळ हे दोनच तरुण नव्हे, तर या कुटुंबातील सहाही मुले आज विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करत आहेत. गोकुळ वाणी फार्मसीमध्ये, राहुल वाणी कृषी क्षेत्रात, डॉ. अविनाश वाणी वैद्यकीय क्षेत्रात, तर कु. आकांक्षा वाणी या देखील दंतवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. एकाच कुटुंबातील ही सहा रत्ने समाजासाठी एक मोठी प्रेरणा ठरली आहेत.

दत्तगिरी महाराज म्हणाले की , “आजच्या भौतिक युगात वाणी कुटुंबाने आपल्या मुलांना दिलेले संस्कार पाहून मन प्रसन्न झाले. एकत्र कुटुंब पद्धती आणि उच्च शिक्षण यातूनच समाजाचा विकास होतो. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून या मुलांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला आहे, त्यांना माझा आशिर्वाद आहे.”

या सोहळ्याला संगमनेरमधील राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. एकाच कुटुंबातील मुलांनी एकत्र येऊन केलेल्या या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. प्रशांत आणि विवेक वाणी यांच्या या नव्या प्रवासाला संगमनेरकरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

