१४ एप्रिलला ‘संघम् शरणम् गच्छामी’ महानाट्याचा प्रयोग; अकोलेकरांना विचारांची मेजवानी
अकोले । झुंझार न्यूज
अकोले शहराच्या वैचारिक परंपरेचा वारसा जपणारी आणि गेली तीन दशके अविरत सुरू असलेली ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमाला यंदा ११ ते १४ एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेत यंदा ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्यापासून ते नामवंत कीर्तनकारांपर्यंत अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून, समारोप ‘संघम् शरणम् गच्छामी’ या भव्य महानाट्याने होणार आहे.
पहिले पुष्प: शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न
व्याख्यानमालेची सुरुवात गुरुवारी, ११ एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या व्याख्यानाने होईल. ‘शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या अत्यंत कळीच्या विषयावर ते पहिले पुष्प गुंफणार आहेत. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या आपल्या गाजलेल्या पुस्तकातून पी. साईनाथ यांनी देशातील शेती संकट आणि गरिबीवर दाहक वास्तव मांडले आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. बबनराव महाले तर स्वागताध्यक्ष प्रा. बाळासाहेब मेहेत्रे असतील.
कविता आणि कीर्तनातून समाजप्रबोधन
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी, १२ एप्रिल रोजी नव्या पिढीतील कवी डॉ. स्वप्नील चौधरी ‘चल दंगल समजून घेऊ’ या विषयावर कवितांचा विशेष कार्यक्रम सादर करतील. अध्यक्षस्थानी ह. भ. प. विवेक महाराज केदार व स्वागताध्यक्ष डॉ. सखाराम घनकुटे असतील.
तिसऱ्या दिवशी, १३ एप्रिल रोजी सुप्रसिद्ध प्रबोधनकार आणि कीर्तनकार ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज ‘समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडतील. ह. भ. प. संपत महाराज भोर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्राचे स्वागत ह. भ. प. डॉ. भाऊराव महाराज उघडे करतील.
१४ एप्रिल: भव्य महानाट्याचा प्रयोग
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी सायंकाळी हैदराबाद येथील ‘अभ्युदय कला अकादमी’च्या २१ कलाकारांचा संच ‘संघम् शरणम् गच्छामी’ हे महानाट्य सादर करणार आहे. देशभरात ८०० हून अधिक यशस्वी प्रयोग झालेल्या या नाटकात ज्येष्ठ अभिनेते जग्गाराजू यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली आहे. या कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे व स्वागताध्यक्ष आयाज शेख असतील.
वैचारिक अभिसरणाचे केंद्र
गेल्या ३० वर्षांपासून अकोलेत ही व्याख्यानमाला सुरू आहे. या व्यासपीठावरून आजवर डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोळकर, मेधा पाटकर, विश्वास नांगरे पाटील यांसारख्या अनेक दिग्गजांनी अकोलेकरांशी संवाद साधला आहे. यंदाही या व्याख्यानमालेच्या निमित्ताने तालुक्यात वैचारिक मंथन घडणार आहे.
विशेष आकर्षणे
व्याख्यानस्थळी भव्य पुस्तक प्रदर्शन आणि विक्री स्टॉल्सची सोय. व्याख्यानापूर्वी तालुक्यातील गायकांकडून ‘समतेची गाणी’ सादर केली जातील.
संयुक्त जयंती महोत्सव समिती, बळीराजा अभ्यास मंडळ, छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, समता परिषद, इब्टा, साथी अमृतभाई मेहता प्रतिष्ठान यांसह विविध व्यापारी, शिक्षक आणि प्राध्यापक संघटनांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या वैचारिक उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.