५० एकरांच्या परिसरात भक्ती आणि संस्कृतीचा महासंगम

 

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुंजाळवाडी येथील ५० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. गगणगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी जणू भक्तीचा महाकुंभच भरला असून, दररोज हजारो भाविक या सोहळ्याचा लाभ घेत आहेत. शिस्तबद्ध नियोजन आणि भव्य आयोजनामुळे हा सप्ताह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

संगमनेर शहरापासून पश्चिमेला १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गुंजाळवाडी चौफुलीवर या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ५० एकरांच्या अवाढव्य जागेत जप, यज्ञ, महाप्रसादालय, कीर्तन आणि आरोग्य विभागासाठी भव्य व आलिशान मंडप उभारण्यात आले आहेत. येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आणि मोठ्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.


या सप्ताहाचे नियोजन दिलीपराव शिंदे व आबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोखपणे केले जात आहे. आतापर्यंत अनेक महंतांनी आणि राजकीय नेत्यांनी सप्ताहाला भेट देऊन येथील नियोजनाचे कौतुक केले आहे. संगमनेर शहर, घुलेवाडी फाटा ते सप्ताह स्थळापर्यंत ठिकठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले असल्याने बाहेरील भाविकांना मार्ग शोधण्यात कोणतीही अडचण येत नाही.


सप्ताहाच्या नित्यक्रमात दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण केले जाते, तर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ होतो. या आध्यात्मिक कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन होत असून परिसर विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.


केवळ अध्यात्मच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी येथे ‘कृषी महोत्सवा’चेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध बि-बियाणे, आधुनिक औषधे, आणि शेतीविषयक सल्ले दिले जात आहेत. तसेच विविध खाद्यपदार्थ, आरोग्यदायी उत्पादने आणि लिक्विड विक्रीचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी पाळणे, रहाटगाडगे असल्याने या सप्ताहाला एका मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


‘माणुसकी’ आणि ‘दानधर्म’ ही सप्ताहाची मुख्य सूत्रे दिसून येत आहेत. अनेक गावे स्वयंप्रेरणेने अन्नदानासाठी पुढे येत असून, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो भक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.


गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या सोहळ्याची सांगता १५ जून रोजी होणार आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *