◻️ग्रामस्थांची कारवाईची मागणी, अन्यथा रस्ता रोकोचा इशारा
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सार्वजनिक सुविधेसाठी बसवण्यात आलेले स्ट्रीट लाईटचे तब्बल सात पोल आणि हायमॅक्सचे दिवे चोरीला गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे खाजगी सह ग्रामपंचायत मालमत्तेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Oplus_131072
कोकणगाव – मनोली रोडवरील ‘खालचा मळा’ या वस्तीवर ग्रामस्थांच्या सोयीसाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिवे (स्ट्रीट लाईट) बसवण्यात आले होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने येथील सात पोल आणि सात हायमॅक्स लाईट लंपास केले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात चर्चाना उधाण आले असून सरकारी मालमत्तेची अशा गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिक हौशीराम माधव जोंधळे यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “चोरीला गेलेले सर्व पोल आणि लाईट आम्हाला तात्काळ सुस्थितीत परत बसवून मिळावेत आणि या मागील दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.”
तसेच प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास, मळ्यातील सर्व नागरिक एकत्र येऊन ‘कोल्हार – घोटी’ राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करतील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
हौशीराम जोंधळे यांनी हे निवेदन कोकणगाव शिवापूर ग्रामपंचायत, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, संगमनेर पंचायत समिती, आमदार अमोल खताळ यांच्यासह पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संगमनेर येथील कार्यालयात देखील दिले आहे. दरम्यान, या निवेदनावर सुमारे ४० ते ४५ महिला व पुरुष ग्रामस्थांच्या सह्या आहेत.