नाशिक व नगर जिल्ह्यांच्या सीमेवरील महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर भाविक व पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कळसुबाई मित्र मंडळाने केली आहे.
या संदर्भात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी वनमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
गेल्या तीन दशकांपासून कळसुबाई मातेच्या सेवेत कार्यरत असलेल्या गिर्यारोहकांनी निवेदनात नमूद केले की, कळसुबाई शिखर हे धार्मिक, नैसर्गिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थळ असून दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक येथे भेट देतात. मात्र, अलीकडील काळात प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या व अन्नपदार्थांचे अवशेष यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून पर्यावरणीय समतोल व जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे.
तसेच, स्वच्छता सुविधा, कचरा व्यवस्थापन, नियंत्रण यंत्रणा व जनजागृतीच्या अभावामुळे ही समस्या गंभीर होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
कळसुबाई परिसरात नियमित कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा उभारावी व प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध लावावेत.
भाविकांसाठी सावली शेड, स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी; तसेच सूचना फलक लावावेत. कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग परिसरात वनौषधी व फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी.
कळसुबाई मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसराचे सुशोभीकरण करावे.
बारीगाव मार्गे असलेल्या जीर्ण लोखंडी शिड्या बदलून दुहेरी (ये-जा) व्यवस्था तातडीने उभारावी.
इंदोरे गावातून माकड कड्यावरून जाणारा प्राचीन मार्ग पुन्हा सुरू करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
या उपाययोजना तातडीने राबविल्यास कळसुबाई शिखराचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहील, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला.
यावेळी अनिल भोपे, कैलास कडू, प्रवीन भटाटे, महेंद्र आडोळे, विकास शेंडगे, निलेश पवार आदी उपस्थित होते.