सेवा सहयोग फाउंडेशनच्या मदतीने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे दालन खुले
झरेकाठी । झुंझार न्यूज
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोरे येथे ‘कुसुमाग्रज वाचनालय’ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठी भर पडली असून परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी व शिक्षणाधिकारी मा. भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून जिल्ह्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. याच प्रेरणेतून अंभोरे शाळेने पाऊल उचलले असून, या कामी मुंबई येथील ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ या नामांकित सामाजिक संस्थेने मदतीचा हात दिला आहे.

२३ हजारांचे साहित्य उपलब्ध
सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने शाळेला १० हजार रुपये किमतीची विविध विषयांची उत्तमोत्तम पुस्तके आणि १३ हजार रुपये किमतीचे सुसज्ज असे ग्रंथालय कपाट भेट देण्यात आले आहे. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना आता एकाच ठिकाणी गोष्टींची पुस्तके, ज्ञानकोश आणि अवांतर वाचनाचे साहित्य उपलब्ध झाले आहे.
हे वाचनालय साकारण्यासाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती अनिता कांगणे व शिक्षक नामदेव सानप यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच शाळेला ही मदत मिळणे शक्य झाले. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बेलोटे, ज्येष्ठ शिक्षक वसंत वाकचौरे, सोमनाथ पावसे, श्रीमती जया आहेर आणि श्रीमती स्नेहल साळुंके यांच्या सामूहिक प्रयत्नातून शाळेला सध्या विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला असून, लोकसहभागातून शाळेचा कायापालट होत आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना संगमनेरचे गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब गुंड म्हणाले की, “कुसुमाग्रज बाल वाचनालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडणार आहे. वाचनामुळे विद्यार्थ्यांची वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होईल.”

संगमनेर खुर्द बीटच्या विस्तार अधिकारी मा. मंगल कलगुंडे आणि पिंपरणे केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती स्मिता धनवटे यांनीही शाळेला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शिक्षक व व्यवस्थापन समितीला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई आणि सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे विशेष आभार मानण्यात आले. या वाचनालयामुळे अंभोरे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


